नागपुरातील महामेट्रोचे 'लिटिल वूड' वन्य प्राण्यांसह सगळ्यांचे आकर्षणाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 10:29 PM2020-01-21T22:29:03+5:302020-01-21T22:31:06+5:30
हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षांची लागवड आणि त्याचे संगोपन अतिशय महत्त्वाचे आहे. हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे. पर्यावरणासंबंधी महामेट्रोची कार्यप्रणाली नेहमीच गांभीर्याने करण्याची असल्याने पर्यावरणपूरक हरित मेट्रोची निर्मिती करण्याचा निर्णय महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृ्रजेश दीक्षित यांनी घेतला होता.
अल्पकाळातच हिंगणा मार्गावर ‘लिटिल वूड’ आणि अमरावती मार्गावर ‘एक्स्टेंशन लिटिल वूड’ स्थापन करून १४,५०० विविध प्रजातीय झाडांचे रोपण आणि संगोपन केले गेले. पर्यावरणपुरक वृक्षांसह फळ-फुलांचे वृक्ष तसेच औषधीयुक्त वृक्षांचे संगोपन महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. व्यस्त व रहदारीच्या परिसरात फळ-फुलांच्या सुगंधाने वातावरण बहरून आले आहे. देशी-विदेशी शेकडो पक्ष्यांव्यतिरिक्त १५० पेक्षा जास्त मोर-लांडोरांनी या क्षेत्रात आश्रय घेतला आहे. सुंदर पक्षाशिवाय वन्य प्राण्यांचे अनेक पुरावे या भागात सापडले आहे.
बिबट्याने लिटिल वूड येथे आपले पगमार्क सोडले आहेत. श्रमिक शिवचंद्र कोडचा हे बिबट्याला प्रत्यक्ष पहिल्याचे साक्षीदार ठरले आहे. लिटिल वूडचे सौंदर्य आणि हिरवळीमुळे प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक भेट देत आहेत. ३६ औषधीय प्रजातीचे वृक्ष लावले जात आहेत. त्यात पिंपळ, वड, कडुनिंब, हिरडा, रिठा, महारूख अशा वृक्षांचा समावेश आहे. या भागात दुर्लभ प्रजातीचे पक्षी येत असतात. पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक सौंदर्याचे जतन या दोन्ही उद्देशाने करण्यात आलेले हे प्रयोजन नागपूर मेट्रोला अधिक विशेषत: प्राप्त करून देणारे ठरले आहे.
लिटिल वूडमध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी लावण्यात आलेली झाडे आता १५ ते २० फूट उंच झाली आहेत. फळांनी लगडलेल्या वृक्षांवर विविध प्रजातीचे पक्षी दिवसभर चिवचिवाट करीत असतात. सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते.