संत्रा प्रक्रियेत ‘एमएआयडीसी’लाही अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:54+5:302020-12-03T04:18:54+5:30
नागपूर : संत्र्यावर प्रक्रिया करणारे नागपूर मिहान येथील ‘फूड पार्क’ आणि ठाणाठुणी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथील ‘ऑरेंज उन्नती ...
नागपूर : संत्र्यावर प्रक्रिया करणारे नागपूर मिहान येथील ‘फूड पार्क’ आणि ठाणाठुणी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथील ‘ऑरेंज उन्नती प्रकल्प’ चार वर्षानंतरही पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘एमएआयडीसी’ (महाराष्ट्र राज्य कृषी उद्याेग विकास महामंडळ)ने विदर्भात दाेन तर पणन महासंघाने एक असे एकूण तीन प्लांट सुरू केले हाेते. यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी ते दुसऱ्यांना चालवायला दिले आहेत. यातील एमएआयडीसीचा काटाेल येथील ‘मल्टी-लाईन प्लांट’ बंद असून, माेर्शी तसेच पणन महासंघाचा कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) येथील प्लांट ‘महाऑरेंज’ (महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक सहकारी संस्था)ला चालवायला दिला आहे.
काटाेल, माेर्शी व कारंजा (घाडगे) येथील प्लांटची उभारणी ३० वर्षांपूर्वी करण्यात आली हाेती. ते तिन्ही प्लांट २० वर्षे बंदच हाेते. एमएआयडीसीने काटाेल येथील प्लांट ‘अलायन्स ॲग्राे’ला तर माेर्शी येथील ‘महाऑरेंज’ला चालवायला दिला. साेबतच ‘महाऑरेंज’ने कारंजा (घाडगे) येथील प्लांट चालवायला घेतला आहे. एमएआयडीसी व अलायन्स ॲग्राेमधील वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्लांटमध्ये संत्रा व इतर फळांचा ज्यूस व त्यापासून इतर उत्पादने तयार केली जायची. २० काेटी रुपये किमतीचा व ५०० टन क्षमतेचे शीतगृह असलेला हा प्लांट आता अवसायनात निघाला आहे.
माेर्शी व कारंजा (घाडगे) येथील प्लांटमध्ये चार वर्षांपासून संत्र्याचे ‘ग्रेडिंग’ व ‘व्हॅक्स काेटिंग’ केले जाते. या दाेन्ही प्लांटची ‘ग्रेडिंग’ व्हॅक्स काेटिंग’ क्षमता अनुक्रमे तीन व दीड टन प्रति तास आहे. हीच अवस्था नागपूर शहरातील ‘नाेगा’ची आहे. नाेगाची संत्रा प्रक्रिया क्षमता दाेन टन प्रति दिवस आहे. वास्तवात, चालू हंगामात अंबिया बहाराच्या संत्र्याचे ७ लाख टन उत्पादन झाले असून, यातील ६० टक्के अर्थात ४ लाख २० हजार टन संत्रा हा ‘टेबल फ्रूट’ तर ४० टक्के म्हणजेच २ लाख ८० हजार टन संत्रा हा मध्यम व छाेट्या आकाराचा आहे. ‘टेबल फ्रूट’ला ‘व्हॅक्स काेटिंग’ची तर इतर संत्र्याला ‘क्रश’ करून त्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया उद्याेगाच्या अभावामुळे चांगल्या प्रतीच्या ‘टेबल फ्रूट’चे दर काेसळतात, अशी माहिती संत्रा उत्पादकांनी दिली.
---
१२ खासगी प्लांट
वरुड व माेर्शी तालुक्यात चार वर्षांमध्ये १२ खासगी प्लांट तयार झाले असून, त्यात संत्र्याला ‘ग्रेडिंग’ व ‘व्हॅक्स काेटिंग’ केले जाते. त्या सर्व प्लांटची सरासरी क्षमता ५०० ते २,००० टन प्रति दिवस आहे. तुलनेत नागपूर जिल्ह्यात एकमेव खासगी प्लांट असून, त्याची क्षमता फार कमी आहे. नागपूर शहरात राेज ५०० ते १,००० टन संत्र्याची आवक असते. ‘ग्रेडिंग’ व ‘व्हॅक्स काेटिंग’ची साेय नसल्याने अमरावतीच्या तुलनेत नागपुरात संत्र्याला किमान एक हजार रुपये प्रति टन भाव कमी मिळताे.
---
संत्र्याची उत्पादकता
स्पेनमध्ये संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर ७० ते १०० टन असून, विदर्भात ती सरासरी प्रति हेक्टरी ७ टन आहे. मध्य प्रदेशात ही उत्पादकता सरासरी १६ टन तर पंजाबमध्ये किन्नाे संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर २३ टन एवढी आहे.
---
आपण वर्षानुवर्षे एकाच जातीच्या संत्र्याचे उत्पादन घेत आहोत. त्यामुळे त्यावर संशाेधन करणे गरजेचे आहे. संत्र्याला चांगला भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संत्र्याचे लीफ अनॅलेसिस, प्रूनिंग व फिनिंग करणे तर शासनाने संशाेधनासाेबत संत्र्याचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे. या बाबींवर काम केल्यास निर्यातक्षम संत्र्याचे उत्पादन करणे सहज शक्य आहे.
- श्रीधर ठाकरे,
कार्यकारी संचालक, महाऑरेंज.