मुख्य सोहळा शनिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:18 AM2017-09-26T00:18:54+5:302017-09-26T00:19:30+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून येत्या २७ सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा होईल. याबाबत सोमवारी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.
पत्रपरिषदेला स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, अॅड. आनंद फुलझेले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार उपस्थित होते.
उद्या महिला परिषद
दीक्षाभूीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याची सुरुवात बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिला परिषदेद्वारे होणार आहे. २८ तारखेला सायंकाळी ६ वाजता ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे नाटक सादर करण्यात येईल. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. विलास गजघाटे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने पंचशील झेंड्याला मानवंदना दिली जाईल. त्याच दिवशी सायंकाळी धम्मपरिषद होईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी राहतील.
गुरुवारपासून धम्मदीक्षा
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्यात दरवर्षी हजारो लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यंदाही २८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू होईल. ३० तारखेपर्यंत तो चालेल.
मुख्य समारंभाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि यूसीएन या नागपुरातील वाहिन्यांवरून होणार आहे.