२१ व्या शतकात पर्यावरणातील प्रदूषण मुख्य आव्हान : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 09:13 PM2019-06-05T21:13:37+5:302019-06-05T21:16:13+5:30
२१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक(निर्मिती) चंद्रकांत थोटवे, पर्यावरण तज्ज्ञ तथा एनजीओचे संस्थापकदेबी गोयंका, अरुण कृष्णमूर्ती, माजी कुलगुरूडॉ. विलास सपकाळ, मुख्य शास्त्रज्ञ श्रीपाल सिंग, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येवूल, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ डी. एम. शिवणकर, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मुख्य अभियंता राजू घुगे, कार्यकारी संचालक राजू बुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तापमान वाढीच्या परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही आज सर्व जगाची समस्या बनली आहे. तीव्र वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठे संकट आहे. दुष्काळात तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे. शहरात वाहतुकीमुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उद्योगधंद्यामुळे नदी-नालेदेखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. यावर उपाय म्हणून शासनासोबतच नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी समोर यावे. पर्यावरण रक्षण हे जनआंदोलन व्हावे. आपल्या देशाला सौर ऊर्जेचे वरदान मिळाले आहे. यासाठी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे. जुन्या तंत्रज्ञानाला बाजूला सारून विविध उद्योगधंदे, हॉटेल्स, दवाखाने, शाळा येथील सर्व व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ देबी गोयंका, डॉ. साधना रायलू, डॉ. संजय ढोबळे, डॉ. नीरज खटी, डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.संजय दानव, डॉ.अश्विनी दानव-बोधाने यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पर्यावरण क्षेत्राशी निगडित असलेले ज्वलंत विषय, जनजागृती व जाणिवा निर्माण करण्यासाठी पर्यावरण, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ रसायनशास्त्रज्ञ अधिकारी-अभियंते तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ तसेच महानिर्मिती, निरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर विद्यापीठ व पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे अधिकारी, अभियंता, प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
प्रत्येक घरी दोन झाडे द्या
पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी लहान-लहान गोष्टीतूनही काम करता येते. महाजेनकोने वृक्षारोपण करण्यासाठी जिल्हा टारगेट करावा. प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्याचा उपक्रम राबवावा. महाजेनकोने रोपवाटिका विकसित कराव्यात. आपले शहर पर्यावरणपूरक बनावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टीकचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. वीज प्रकल्प क्षेत्रातील नाले जोड प्रकल्प राबवण्याबाबतही विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
संशोधनासाठी प्रोत्साहन
पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणऱ्यांना शासनाच्यावतीने प्रोत्साहन दिले जात आहे. एक टीम नुकतीच कॅलिफोर्नियाला अभ्यासासाठी पाठवण्यात आली होती. तेव्हा पर्यावरणविषयक अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमीने समोर यावे, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले