कस्तुरचंद पार्कवर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 09:10 PM2023-01-25T21:10:11+5:302023-01-25T21:10:43+5:30
Nagpur News प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व पथसंचलनाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर उद्या २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.
नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व पथसंचलनाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर उद्या २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवरून पाहता येणार आहे.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परेडचे निरीक्षण करतील. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या पथसंचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बिरादार करतील तर दुय्यम कमांडर राखीव पोलिस उपनिरीक्षक संतोष गिरी असतील.
शहीद जवानांच्या वारसांचा व अपंग जवानांचा गौरव
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात शहीद जवानांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या जवानांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डाॅ. शिल्पा खरपकर यांना ध्वजदिन निधी संकलनात १७० टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांच्या सोईसाठी समाजमाध्यमावरून प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. हे प्रक्षेपण https://fb.me/e/27dgeYTzz या लिंकवर पाहता येईल.
सायंकाळी डॅा. वसंतराव देशपांडे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.