विकासपर्वाची मु हू र्त मे ढ
By Admin | Published: October 30, 2015 02:53 AM2015-10-30T02:53:23+5:302015-10-30T02:53:23+5:30
३१ आॅक्टोबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ ! म्हणायला तर केवळ एकच वर्ष. परंतु वर्षातील या ३६५ दिवसांमध्ये संत्रानगरी अशी ओळख...
देवेंद्र फडणवीस
सरकारची वर्षपूर्ती :
नागपूरचा ‘स्मार्ट’ प्रवास
नागपूर : ३१ आॅक्टोबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ ! म्हणायला तर केवळ एकच वर्ष. परंतु वर्षातील या ३६५ दिवसांमध्ये संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूरचा विकासाच्या मार्गावर आश्वासक प्रवास सुरू झाला आहे.
नागपूरच्याच मातीचे सुपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपराजधानीला कधी नव्हे ते प्राधान्य देण्यात येत आहे. वर्षभरात विविध विकासकामांना धडाक्याने सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांतून नागपूर हळूहळू कात टाकत आहे. परंतु दुसरीकडे नागरिकांच्या अपेक्षादेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना यापुढे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आणि वर्षभरात नागपूरचे नाव जागतिक क्षितिजावर चमकू लागले आहे. देशविदेशातील गुंतवणूकदार नागपूरमध्ये यावे याकरिता जागतिक स्तरावरदेखील ‘मिहान’चे नियोजनबद्ध ‘मार्केटिंग’ सुरू झाले. उद्योग जगताचे लक्ष ‘मिहान’कडे गेले आणि विविध देशांतील गुंतवणूकदारांनी येथे भेट देण्यास सुरुवात केली. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनीदेखील देशातील पहिला ‘एअरोस्पेस पार्क’ प्रकल्प स्थापन करण्यासाठी नागपूरचीच निवड केली. देशातील नामवंत व्यवस्थापन शिक्षण संस्था ‘आयआयएम’मुळे नागपूरची शैक्षणिक ‘हब’कडे वाटचाल सुरू झाली. घोषणा होण्यापासून ते अगदी प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यापर्यंतच्या वर्षभरातील वेगवान घडामोडींनी सर्वांना आश्चर्यचकित केले. शिवाय याच वर्षात नागपूरचा समावेश ‘मेट्रो क्लब’मध्ये झाला व ‘मेट्रो’ येण्याचा मार्ग मोकळा झाला.
पायाभूत सुविधांचा विकास होत असताना ग्रामीण भागातदेखील आश्वासक चित्र पहायला मिळाले. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली व शेतकऱ्यांना थेट फायदा झाला. याशिवाय १०० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या. सामाजिक क्षेत्रातदेखील सरकारने भरीव कार्य केले व दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, कोराडी देवी मंदिराच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली. सामान्य जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी दोन समाधान शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. एकूणच या वर्षभरात उद्योग, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक क्षेत्रात नागपूरने चांगली मजल मारली. हाती घेतलेल्या योजनांना वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान शासनासमोर आहे आणि असे झाले तरच नागपूरचा समावेश देशातील अग्रणी शहरांमध्ये होईल, अशी नागपूरकरांची भावना आहे.(प्रतिनिधी)