युवकांना रोजगार मुख्य प्राथमिकता
By admin | Published: August 29, 2015 03:01 AM2015-08-29T03:01:56+5:302015-08-29T03:01:56+5:30
विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे.
नितीन गडकरी : मागास व आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा प्रयत्न
नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. रिलायन्स समूहामुळे औद्योगिक घराणे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. देशातील मागास आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा सरकारचा प्रयत्न आहे. अलीकडेच गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.(प्रतिनिधी)
विमानतळासाठी जागतिक निविदा
नागपूर विमानतळासाठी लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. येथील एमआरओमध्ये मलेशिया, चीन, इंडोनेशिया यासह जगभरातील विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी यावीत, यासाठी विमान दुरुस्ती कर माफ करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
उद्योगांना स्वस्त वीज : बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान-सेझमधील उद्योगांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत होते. आता अखंड वीज येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्यांचा युनिट दर ४.४० रुपये असून तो पुढेही कायम राहील. अंबानी यांच्या उद्योगांनाही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दरात वीज देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
मिहान झाले ‘महान’ : देसाई
सुभाष देसाई म्हणाले, अनिल अंबानीच्या प्रकल्पामुळे मिहान आज ‘महान’ झाला आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची मोहीम यशस्वी करावी लागेल. यासाठी राज्य सरकार उद्योगांना जमीन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क आल्यामुळे विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल.
फडणवीस दूरदृष्टी असणारे नेते
अनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुक्तकंठाणे प्रशंसा केली. फडणवीस यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार व काटेकोरपणा वाखाळण्याजोगा आहे. राज्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. हा प्रकल्पासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व जमीन हस्तांतरणासाठी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करण्यासाठी रिलायन्सचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.