वैभवशाली उज्ज्वल परंपरा कायम राखू
By admin | Published: January 28, 2017 01:40 AM2017-01-28T01:40:03+5:302017-01-28T01:40:03+5:30
भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा करू या,
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे : कस्तूरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिन सोहळा; पथसंचलन, विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायती
नागपूर : भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा करू या, असे आवाहन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवकरणीय ऊर्जा, उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळ्यात केले.
कस्तुरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर पथसंचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विशेष पोलीस महानिरीक्षक पाटणकर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, राज्य राखीव पोलीस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारल्यानंतर पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, शासन, प्रशासन आणि जनता सर्वांनी मिळून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन २०२० चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचविण्यासाठी शासन प्रशासन मिळून कटिबद्ध होवू या, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, स्वातंत्र्य सेनानी यादवराव देवगडे, माजी जिल्हा परिषद विठ्ठलराव टालाटुले, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, हातमाग संचालक संजय मीना, न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.(प्रतिनिधी)
उत्कृष्ट पथसंचलन आणि पुरस्कार वितरण
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक विक्रम कदम व त्र्यंबक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुलांच्या चमूला प्रथम पारितोषिक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पथसंचलनामध्ये सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलच्या मुलींचा बॅण्ड पथक द्वितीय तर एनसीसी प्लाटूनला तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पथसंचलनामध्ये २१ पथक तसेच चित्ररथ सहभागी झाले होते.
पोलीस सेवेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त सुहास प्रकाश बावणे, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय राठोड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वेश्वर संभाजी हनुमंते यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा पुरस्कारामध्ये अनुज आदमने (तलवारबाजी), कुमारी पूनम कढव (हॅण्डबॉल), कुमारी दामिनी रंभाळ (तलवारबाजी), मोहम्मद शोएब, मो. अल्ताफ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त स्काऊट गाईडमध्ये ऐश्वर्या बांगडकर, किरण रेवतकर, गौरव दुबे आणि प्रत्युष बिसेन यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सामूहिक कवायतीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सेंट जोसेफ स्कूल प्रथम, सेंट ऊसुर्ला गर्ल्स हायस्कूल द्वितीय व सेंट जॉन्स स्कूलची चमू तृतीय ठरली. यावेळी वंदेमातरम देशभक्तीपर गीत, डंबेल कवायत व कराटे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.