मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी मुखाचे आरोग्य चांगले ठेवा-डॉ. चंद्रशेखर मेश्राम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:51 PM2024-02-05T20:51:28+5:302024-02-05T20:51:40+5:30
डेन्टलमध्ये दंत शिक्षण व संशोधन परिषद
नागपूर: निरोगी जीवनासाठी शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूचे पोषण करणे हे देखील एक महत्त्वाची बाब आहे; परंतु अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मेंदूच्या आरोग्यासाठी मुखाचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी येथे केले. पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्यानंतर त्यांच्या हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता.
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेन्टल) व वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सोमवारी महाविद्यालयाच्या सभागृहात मौखिक आरोग्य दिनानिमित्त ‘दंत शिक्षण व संशोन परिषद-२०२४’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद फुलपाटील, मुंबईच्या दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, औरंगाबादच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर, परिषदेचे आयोजक अध्यक्ष व नागपूरचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, आयोजन सचिव डॉ. रितेश कळसकर व परिषदेचे वैज्ञानिक प्रभारी डॉ. ज्योती मानचंदा उपस्थित होत्या. दरम्यान डॉ. मेश्राम यांना स्मृतिचिन्ह दऊन सन्मानित करण्यात आले. संचालन डॉ. शभा हेडगे यांनी केले तर आभार डॉ. रितेश कळसकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. अरुण खळीकर, डॉ. अशिता कळसकर, डॉ. मंजुषा वºहाडपांडे, डॉ. सुलभा रडके, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. सचिन खत्री यांच्यासह वरीष्ठ डॉक्टर, विद्यार्थी उपस्थित होते.
-साखर व मीठामुळे मुखाच्या आरोग्य समस्या
डॉ. मेश्राम म्हणाले, जास्त साखर आणि मीठ खाल्ल्याने दात आणि मुखाच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, हे आपल्याला माहितच आहे. परंतु हे दोन पांढरे पदार्थ मेंदूसाठीही अनेक समस्या निर्माण करतात. भूक न लागताही खात राहणे, हे मुखाचे आणि मेंदूचे आरोग्य बिघडण्याला कारणीभूत ठरतात. दिवसांतू एकदा किंवा दोनदा खाणे आदर्श मानले जाते. ‘इंटरमीडिएट फास्टिंग’मुळे मेंदूच्या कार्यक्षमतेसह एकूणच आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. भेसळयुक्त अन्नामुळे विविध प्रकाराचे आजार निर्माण होतात. यामुळे खाण्यापूर्वी काय खाता, याचा विचार करणे गरजे आहे, असेही ते म्हणाले.