सात आरोपींची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:48 AM2017-11-01T01:48:42+5:302017-11-01T01:48:58+5:30
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली. त्या आरोपींमध्ये विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी यांचा समावेश आहे. मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांची जन्मठेप व अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्याचा आदेश देण्यात आला. न्यायमूर्तीद्वय आदर्श गोयल व उदय लळीत यांनी हा निर्णय दिला.
सत्र न्यायालयाचा निर्णय असा होता
१८ आॅक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रकरणातील १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यात मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांच्यासह अयुब खान अमीर खानचा समावेश होता. वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांच्यासह मयूर ऊर्फ बंटी शिवाजी चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप नीळकंठ सणस यांना निर्दोष सोडण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला
सत्र न्यायालयात शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. तसेच, पिंटू शिर्केची आई विजया व राज्य शासनानेही सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. दोषी आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्याची व निर्दोष सुटलेल्या आरोपींना शिक्षा देण्याची त्यांची विनंती होती. उच्च न्यायालयाने सर्व अपिलांवर एकत्र सुनावणी करून २२ जून २०१५ रोजी निर्णय जाहीर केला. त्याद्वारे मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली तर, अयुब खानला निर्दोष सोडण्यात आले. तसेच, सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या जमिनीवरून होता वाद
राजे भोसले परिवारातील महाराणी अन्नपूर्णादेवी भोसले यांनी दिलीप शिर्के, उदय शिर्के व रणजित शिर्के यांना सक्करदरा येथील २१ एकर जागा भेट दिली होती. ११ मार्च २००१ रोजी पिंटू शिर्के जळगाव येथे लग्न समारंभासाठी गेला होता. दरम्यान, विजय मते व त्याच्या साथीदारांनी यापैकी काही जागेवर कब्जा केला. शिर्के कुटुंबीयांनी मतेला जमिनीवरील कब्जा सोडण्यास सांगितले, पण तो मानला नाही.
अशी घडली घटना
१८ जुलै २००१ रोजी आरोपी विजय मतेवर देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. सईद यांच्यासमक्ष सुनावणी सुरू होती. १९ जून २००२ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास पिंटू शिर्के, सहआरोपी सागर जैन, हितेश उके, पप्पू ऊर्फ नरेंद्र मालवीय आणि इतरांना पोलीस संरक्षणात सईद यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी हा पिंटू शिर्के आणि मालवीय यांना घेऊन होता. प्रकरण दुपारी १२.३० ते १ वाजतादरम्यान लागणार असल्याचे न्यायालय लिपिकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी शिर्के आणि मालवीयला न्यायालयाच्या बाहेर आणले. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी शिर्केवर गुप्ती, चाकू, कुकरी व भाल्याच्या पात्याने हल्ला करून त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. शिर्केचा मेयो रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. दरम्यान, गुन्हे शाखा आणि सदर पोलिसांनी एकूण १६ आरोपींना अटक केली होती. पुढे हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात आरोपींसाठी नागपुरातील वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, अॅड. आर. के. तिवारी, अॅड. उदय डबले व अॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी कामकाज पाहिले. शासनातर्फे मुख्य वकील निशांत काटनेश्वरकर यांनी बाजू मांडली.