वीज वितरण प्रणालीतील मेंटेनन्स शंकेच्या विळख्यात : शहरासह जिल्ह्यावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:40 AM2019-06-21T00:40:49+5:302019-06-21T00:42:52+5:30
बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने जेव्हा ‘मेंटेनन्सबाबत माहिती घेतली, तेव्हा या वर्षी मेंटेनन्सची निविदाच निघाली नसल्याचे पुढे आले. महावितरणने तीन वर्षांसाठी मेंटेनन्साठी निविदा मागविल्या होत्या. परंतु याच्या किमती खूप जास्त असल्याने कंत्राटदारांनी या निविदाच भरल्या नाहीत. या दरम्यान विनातयारी व पुरेसे मनुष्यबळ नसताना महावितरणने पावसाळ्यापूर्वीच्या कामाची तयारी सुरू केली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, हे काम जुने कंत्राटदार करीत आहे.
सूत्रानुसार, जुन्या कंत्राटदाराने नवीन निविदेसाठी अर्जच केला नाही. त्याने योग्यपद्धतीने मेंटेनन्सचे काम केले नसल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, देखभालीच्या नावाखाली वीज बंद केली जात असल्यचाही आरोप होत आहे.
विजेची मोठी रक्कम मोजूनही नागरिक त्रस्त
हवा चालल्याने किंवा पाऊस आल्याने अचानक वीजपुरवठा बंद होतो. विजेची मोठी रक्कम भरूनही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. या समस्येला घेऊन महावितरणने २६ मार्च २०१५ रोजी अध्यादेश काढून बेरोजगार अभियंत्यांची यात मदत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही याबाबत निर्देश दिले होते. त्यांनी वेगळे ‘पोर्टल’ही तयार करण्याच्याही सूचना दिल्या होत्या.