नागपुरात मेट्रो रेल्वे करणार ‘झिरो माईल’ची देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:26 PM2018-05-11T23:26:15+5:302018-05-11T23:26:31+5:30
झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीचे कामही मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला करावे लागेल, असे सूचितही केले. यासोबतच कस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरणाच्या संशोधित प्रारुपलाही या बैठकीत समितीने मंजुरी प्रदान केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीचे कामही मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला करावे लागेल, असे सूचितही केले. यासोबतच कस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरणाच्या संशोधित प्रारुपलाही या बैठकीत समितीने मंजुरी प्रदान केली. पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागासमोर नकाशा सादर करण्यात आला.
मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात शुक्रवारी नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली. बैठकीत समितीचे सदस्य व प्रसिद्ध आर्किटेक्ट अशोक मोखा, इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शोभा जोहरी, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस. पाटणकर, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, नगररचना विभाग नागपूर विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, मनपाचे नगररचनाकार सोनारे, नागपूर मेट्रो रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राजीव येलवटकर आदी उपस्थित होते.
कस्तूरचंद पार्कमध्ये लोकांच्या सुविधांच्या दृष्टीने जॉगिंग, वॉकिंग, सायकल ट्रॅक, वृक्षारोपण, हिरवळ आदी कामांचा प्रस्ताव मनपाच्या प्रकल्प विभागातर्फे सादर करण्यात आला होता. गेल्या बैठकीत समितीला दोन वेगवेगळे प्रस्ताव प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत समितीने कस्तूरचंद पार्कचा संशोधित प्रस्ताव तयार करून बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा संशोधित प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला समितीने मंजुरी प्रदान केली.
सेमिनरी हिल्स परिसरातील सेंटर पॉर्इंट स्कू लतर्फे हेरिटेज समितीच्या मंजुरीशिवाय बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील वृक्ष व पर्यावरणाला नुकसान पोहोचले असल्याची तक्रार विवेक सिंह यांनी समितीकडे केली होती. यावर समितीने संंबंधित प्रकरणाच्या चौकशीसाटी डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठित करण्याचे आदेश दिले. यात अशोक मोखा व पी.एस. पाटणकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. ही समिती चौकशी करून योग्य अहवाल सादर करेल.
कस्तूरचंद पार्कमध्ये अमर सर्कस संचालित करण्यासाठी नीरज घाडगे यांनी प्रस्ताव सादर केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत हेरिटेज संवर्धन समितीने हा प्रस्ताव नामंजूर केला.