‘मिसा’बंदी सत्याग्रहींना सवलती मिळाल्याच पाहिजेत- नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 07:58 PM2017-07-30T19:58:32+5:302017-07-30T19:59:27+5:30
आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते.
नागपूर, दि. 30 - आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते. त्यांच्यामुळेच लोकशाहीचे रक्षण झाले होते. इतर राज्यांतील सत्याग्रहींना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ‘मिसा’बंदी सत्याग्रहींनादेखील सन्मानासह सवलती मिळाल्या पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
राजकीय ‘मिसा’बंदी व ‘डीआयआर’ सत्याग्रहींच्या लोकतंत्र सेनानी संघातर्फे रविवारी एक दिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर सर्व सत्याग्रही गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी गडकरी बोलत होते. देशातील आठ राज्यात ‘मिसा’बंद्यांना विविध सवलती लागू आहेत.मध्य प्रदेशात तर सत्याग्रहींना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. याच धर्तीवर राज्यातदेखील ‘मिसा’बंदी तसेच ‘डीआयआर’ पीडितांना सवलती लागू झाल्या पाहिजेत. सत्याग्रहींच्या मागण्यांना माझे समर्थन आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी चर्चादेखील झाली असून तेदेखील याबाबतीत सकारात्मक आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
‘मिसा’बंदी सत्याग्रहींमध्ये अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अशा स्थितीत त्यांना सवलती लागू झाल्या तर संघाला ते मान्य राहील का, असा मुद्दा समोर आला होता. मात्र संघाची याला आडकाठी नसून लोकशाही वाचविणाºयांना सन्मान मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.