'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा : विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:52 PM2019-12-20T22:52:53+5:302019-12-20T23:14:09+5:30
मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यामुळे आता संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ग्राहकांचे पैसे परत द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली.
आ. विकास ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील ग्राहकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. एकट्या नागपूर शहरातून सुमारे ५० कोटींची गुंजवणूक झाली आहे. कंपनीने कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या व फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद करून पळ काढला. नागरिकांनी हेलपाटे मारूनही त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही. शेकडो नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने वर्षभरापूर्वी संबंधित कंपनीची काही मालमत्ता जप्त केली. संबंधित मालमत्तेची विक्री करून ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कराव्या, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
सिमेंट रोडच्या कामांची चौकशी करा
नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून कामही संथगतीने सुरू आहे. संबंधित रस्त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण करायची होती, कंत्राटदाराने कामे मुदतीत पूर्ण केली का, कामात गुणवत्ता राखली जात आहे का, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ. ठाकरे यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपूर मतदारसंघात तेलंखेडी, झिंगाबाई टाकळी, फुटाळा, टाकळी फिडर रोड, घाट रोड, सेमिनरी हिल रोड येथे सिमेंट रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अर्धवट झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील धूळ उडत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. काही कामांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नाहीत. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.