सडकछाप मजनूने तरुणीचा पिच्छा सोडण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 09:33 PM2022-04-08T21:33:12+5:302022-04-08T21:35:13+5:30
Nagpur News एका तरुणीचा पिच्छा सोडण्यासाठी सडकछाप मजनूने तिच्या वडिलांकडे तब्बल ५० लाखांची मागणी केली.
नागपूर - ट्यूशन क्लासमध्ये मैत्री झाल्यानंतर एक तरुणीवर हक्क दाखविणाऱ्या सडकछाप मजनूने तरुणी तसेच तिच्या नातेवाइकांचा तब्बल चार वर्षे छळ केला. तरुणीचा पिच्छा सोड, अशी समजूत काढणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना ५० लाखांची खंडणी मागितली. तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, ही खात्री पटल्याने अखेर तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पडद्यावरील वाटावा तसा हा घटनाक्रम कळमन्यातील आहे. तक्रारदार तरुणी (वय २३) सध्या शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांचा मोठा व्यापार आहे. २०१७ मध्ये ती वर्धमाननगरातील एका ट्यूशन क्लासमध्ये जायची. तेथे तिची त्यावेळी तेजस मदान (वय २३) याच्याशी मैत्री झाली. मोबाइल नंबर एक्स्चेंज केल्यानंतर ते दोघे मित्रांसारखे एकमेकांशी बोलू लागले. मैत्रीला एक वर्ष झाल्यानंतर आरोपी मदान तिच्यावर हक्क गाजवू लागला. दुसऱ्या मित्रांशी बोलण्यास मनाई करू लागला. त्याचे वर्तन खटकल्याने २०१८ मध्ये तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला. यानंतर त्याने तिचा पाठलाग सुरू केला. ब्लॉक करूनही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहण्याचे प्रयत्न करू लागला.
त्याचा त्रास वाढल्याने तीन वर्षांपूर्वी तरुणीने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. त्यामुळे वडील, काका आणि अन्य काही नातेवाईक आरोपी मदानची समजूत काढू लागले. काही दिवसांपूर्वी आरोपी मदानला असेच समजावत असताना त्याने तरुणीच्या वडील आणि काकांकडे भलताच प्रस्ताव ठेवला. तिच्याशी माझे लग्न करून द्या, असे तो म्हणाला. लग्नास स्पष्ट नकार मिळाल्यामुळे त्याने ५० लाख रुपये द्या, तरच तिचा पिच्छा सोडेन, असे सांगितले. तो मानायला तयार नव्हता. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने अखेर तरुणीने आपल्या पालकांसह गुरुवारी कळमना पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार विनोद पाटील यांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेत आरोपी मदानविरुद्ध विनयभंग करून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच मदान फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
... तर, ३० लाख द्या
गेल्या आठवड्यात तरुणीच्या वडिलांनी त्याला फोन करून आपण ५० लाख रुपये देऊ शकत नाही, असे सांगितले. यावेळी त्याने ‘किती देऊ शकता, अशी विचारणा करून ३० लाख रुपये द्या. अन्यथा जिवाला बरेवाईट करून तुमच्या मुलीची बदनामी करेन, अशी धमकी दिली होती.
---