मोठा अपघात टळला : रुळाखाली खड्डा पडल्यामुळे रेल्वेचा कोच उसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 09:10 PM2021-05-20T21:10:46+5:302021-05-21T01:11:21+5:30
Major accident averted averted नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर इटारसी एण्डकडील भागात रेल्वे रुळाच्या खाली अचानक मोठा खड्डा पडला. लाकडाचे जुने स्लिपर सडले होते. यामुळे रुळावरून जाणारा रेल्वेचा कोच जोरात उसळला. यात रेल्वेगाडी रुळावरून घसरली नसल्याने मोठा अपघात टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर इटारसी एण्डकडील भागात रेल्वे रुळाच्या खाली अचानक मोठा खड्डा पडला. लाकडाचे जुने स्लिपर सडले होते. यामुळे रुळावरून जाणारा रेल्वेचा कोच जोरात उसळला. यात रेल्वेगाडी रुळावरून घसरली नसल्याने मोठा अपघात टळला.
रेल्वेचा कोच उसळल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी युद्धस्तरावर खड्डा बुजविण्याचे काम सुरू केले. परंतु सध्या अस्थायी पद्धतीने खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या मते दोन वर्षांपूर्वी अशीच घटना या परिसरात घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे रुग्णालयाजवळ असलेला नाला रेल्वे रुळाच्या खालून जातो. प्लॅटफार्म क्रमांक १ वर इटारसी एण्डकडील भागातून हा नाला जातो. आज सकाळी ९ वाजता या परिसरात रेल्वे रुळाच्या खाली अचानक सहा फूट खोल खड्डा पडला. याच वेळी दक्षिण एक्स्प्रेस या रुळावरून जात होती. या गाडीचा एसएलआर कोच बराच उंचपर्यंत उसळला. त्यानंतर रुळाखाली खड्डा पडल्याची माहिती पुढे आली. याबाबत त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली
दुरुस्तीचे काम करण्यात आले
‘रेल्वे रुळाच्या खाली खड्डा पडला होता. याबाबत माहिती मिळताच युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली नाही.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग