नागपुरातील टेकडी गणेश उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:08 AM2018-09-30T01:08:47+5:302018-09-30T01:14:06+5:30
गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव रोखण्याची मागणी केली. सत्तापक्षाने याला नकार दिला. यावर काँग्रेसने मतदानाची मागणी केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. यात उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने ९२ तर पूल तोडण्याच्या विरोधात २३ मते पडली. विशेष म्हणजे बसपाचे नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केले.
लोकमत न्यूज नटेवर्क
नागपूर : गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव रोखण्याची मागणी केली. सत्तापक्षाने याला नकार दिला. यावर काँग्रेसने मतदानाची मागणी केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. यात उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने ९२ तर पूल तोडण्याच्या विरोधात २३ मते पडली. विशेष म्हणजे बसपाचे नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केले.
सभागृहात बसपाच्या नगरसेवकांचा उड्डाणपूल तोडण्याला विरोध होता. मात्र बसपाचे प्रभाग ९ मधील नगरसेवक संजय बुर्रेवार यांनी उड्डाणपूल तोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. उड्डाणपुलामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच रहदारीला अडथळा होत असल्याने सत्तापक्षाच्या बाजूने मतदान केल्याची भूमिका त्यांनी मांडली.
व्हीएनआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सभागृहात याबाबतचा विस्तृत अहवाल मांडण्यात आलेला नाही. तांत्रिक अहवाल आलेला नाही. दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नसल्याने प्रस्तावाला विरोध असल्याची भूमिका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मांडली. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनीही सत्तापक्षावर टीका केली.
रामझुल्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जयस्तंभ चौकातील वाहतुकीसंदर्भात व्हीएनआयटी आपला अहवाल देणार आहे. असे असतानाही उड्डाणपूल तोडण्याची घाई कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षाने केला. काँग्रेसचे मनोज सांगोळे म्हणाले, चेंबर, गडर लाईन दुरुस्तीसाठी पैसे नाही. कर्ज घेऊ न शहराचा विकास केला जात आहे. विकासात बाधा असलेले रस्त्यांवरील खड्डे आधी बुजवा, ज्या अधिकाºयांकडे अतिरिक्त प्रभार आहे, त्यांचा भार कमी करा.
भाजपाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, मेट्रो शहरातील वाहतूक व्यवस्थेवर काम करीत आहे. त्यामुळे उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रशासनाला त्यांचा अहवाल मान्य असल्याने यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही.
प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे प्रशासनाची बाजू मांडताना म्हणाले, उड्डाण पुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येईल. १७४ पैकी १६४ दुकानदारांना परवाना दिलेला आहे. तांत्रिक अहवाल महामेट्रोने दिला आहे. तो सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल. महामेट्रो जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान सहापदरी मार्गाचे निर्माण करणार असल्याने उड्डाण पूल तोडण्याचे व दुकानदारांच्या पुनर्वसनाचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. शहर काम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी आराखड्याच्या आधारावर उड्डाण पूल तोडणे आवश्यक आहे.
विकासाच्या नावावर बेरोजगार करण्याचा प्रयत्न
विकासाला काँग्रेसचा विरोध नाही. परंतु विकासाच्या नावाखाली लोकांना बेरोजगार करू नये. १६ कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनसमोरील उड्डाण पुलाखाली १७५ दुकाने उभारण्यात आली. बहुसंख्य दुकानदारांनी यासाठी कर्ज घेतले आहे. रेल्वे स्टेशनपुढे व्यवसाय होत असल्याने याच ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते
आधी पुनर्वसन नंतरच उड्डाण पूल
महामेट्रोने उड्डाण पुलाचा तांत्रिक अहवाल दिला आहे. प्रशासनाने तो मान्य केला आहे. तो सभागृहात ठेवलेला नाही. पुढील सभागृहात ठेवला जाईल. आता प्रश्न दुकानदारांच्या पुनर्वसनाचा आहे. आधी पुनर्वसन नंतरच उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल. येथे १६४ दुकाने देण्यात आलेली आहेत. यातील ७२ सुरू आहेत. दुकानदारांना आधी एमएसआरटीच्या जागेवर अस्थायी दुकाने देण्यात येतील. नंतर त्यांना कायमस्वरुपी जागा दिली जाईल.
संदीप जोशी, सत्ता पक्षनेते