...तर यावेळेस पतंगाच्या मांजाने गळा कापण्याची भीती नाही; तारेवर पडताच क्षणात तुटणार मांजा
By मंगेश व्यवहारे | Updated: January 5, 2025 13:54 IST2025-01-05T13:53:19+5:302025-01-05T13:54:02+5:30
निखिल उंबरकर यांनी मांजामुळे होणारे अपघात, गळे कापाकापी टाळता येईल, यासाठी एक उत्तम मॉडेल तयार केले आहे.

...तर यावेळेस पतंगाच्या मांजाने गळा कापण्याची भीती नाही; तारेवर पडताच क्षणात तुटणार मांजा
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मकरसंक्रांती जवळ येताच दुचाकी चालविणारे जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नायलॉन मांजा कधी कुणाच्या गळ्याचा फास घेईल हे सांगताच येत नाही. पतंग उत्सवात नायलॉन मांजा वापर टाळावा म्हणून पोलिस व महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी कारवाया केल्या जातात. मात्र, त्यावर पूर्णपणे अंकुश मिळविणे प्रशासनालाही शक्य झाले नाही. निखिल उंबरकर यांनी मांजामुळे होणारे अपघात, गळे कापाकापी टाळता येईल, यासाठी एक उत्तम मॉडेल तयार केले आहे. त्याने तयार केलेल्या मॉडेलमध्ये लावलेल्या तारेवर मांजा पडताच अगदी क्षणात तुटत असल्याने मांजामुळे होणारी प्राणहानी टाळण्यास मदत होणार आहे.
निखिल हे ऑटोमोबाइल इंजिनीअर असून, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी त्यांनी यापूर्वी हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरूच होणार नाही, असे हेल्मेट तयार केले होते. रुफ टॉप ब्रेक विकसित केले होते.
मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही निखिलने एक मॉडेल तयार केले आहे. त्या मॉडेलमध्ये एक रस्ता असून, रस्त्याच्या दुतर्फा विद्युत खांब आहेत. या खांबांच्या आधारे एक तार लावली आहे. या तारेमध्ये डीसी करंट सोडला आहे. या तारेवर मांजा ठेवताच तो लगेच तुटून जातो.
हा माझा डेमो प्रोजेक्ट आहे. स्थानिक प्रशासनाने सहकार्य केल्यास मी ते प्रत्यक्षात शहरामध्ये काही भागात राबवू शकतो. या प्रोजेक्टचे महत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पटवून देणार आहे. मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी माझी कल्पना उपयोगात आणल्यास मांजामुळे होणाऱ्या अपघातातून बऱ्यापैकी मुक्ती मिळू शकेल.
- निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल इंजिनीअर