वादळग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करा

By Admin | Published: May 24, 2016 02:40 AM2016-05-24T02:40:22+5:302016-05-24T02:40:22+5:30

येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा.

Make all the facilities available to the storm victims | वादळग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करा

वादळग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करा

googlenewsNext

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : दुष्काळी भागाचा पाहणी दौरा
नागपूर : येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत युद्धस्तरावर पुरवा. उन्हाळा असल्यामुळे या भागातील पाणीटंचाईचे निवारण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून करावे. पाच दिवसांत गावांचे नियमितपणे व्यवहार सुरू व्हावेत अशा व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
काटोल-नरखेड तालुक्यात गेल्या १९ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून वादळग्रस्तांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी या भागाचा दौरा केला. यावेळी या भागाचे आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प.चे शिक्षण सभापती उमेश चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, काटोलचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
गेल्या १९ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने जामगाव व खापा या दोन गावांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जामगावातील १५२ घरांचे नुकसान झाले. तर १०८ हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान वादळाने झाल्याचे आढळले. वादळाच्या तडाख्यात एकूण १० गावे सापडली होती. ही दहा गावे नरखेड तालुक्यातील होती. पाच मिनिटे झालेल्या या वादळात ३८५ घरांचे नुकसान होऊन ३३५ हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावांमधील वीजपुरवठा दोन दिवस खंडित होता. पण सोमवारी फक्त जामगाव वगळता संपूर्ण गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जामगाव येथील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत होईल. वादळग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व महावितरणच्या चमू युद्धस्तरावर काम करीत असून वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर आहेत. वादळामुळे ३३ केव्हीचे १६ पोल खाली पडले. लोखंडी खांबे वाकून ते इंग्रजीच्या यू आकाराचे झाले. सिमेंटचे विजेचे खांब मधून तुटले. एवढेच नव्हे तर जामगाव येथील ट्रॉन्सफॉर्मर डीपी खाली पडली.
मोठमोठी शेकडो झाडे विजेच्या तारांवर पडल्यामुळे खांब वाकले. ११ केव्हीचे २८ खांब वाकले. घरगुती वीजपुरवठा करणारे गावठाणातील २० खांब वाकले व शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे १५० खांब वाकले आहेत. दोन ट्रॉन्सफॉर्मर वादळामुळे बिघडले. वादळगस्त भागाचे वीज साहित्याचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून नुकसानग्रस्त भागातील वीज पुरवठ्याच्या साहित्याचा निधी लवकर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
जामगाव व परिसरात खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. परिणामी जिल्हा प्रशासनाने तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा सुरू केला असून नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येत आहेत. तसेच रॉकेलचा पुरवठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वादळानंतर सुमारे आठवडाभरात जनजीवन सामान्य होत आहे. शासनाच्या संबंधित विभागाच्या चमू या भागात दाखल झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज व सर्वेक्षण सुरू असून अनेकांची घरावरील छपरे उडून गेली. जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. वादळामुळे एक गाय व एक बैल दगावला. या दोन्ही जनावरांची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्याला देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)

Web Title: Make all the facilities available to the storm victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.