जनावरांसाठी चॉकलेट, लाडू बनवा अन् महिन्याला ५० हजार रुपये कमवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 07:00 AM2023-05-12T07:00:00+5:302023-05-12T07:00:06+5:30
Nagpur News चॉकलेट अन् लाडू सामोर आल्यावर ते खाण्याचा मोह सर्वांनाच होतो! मात्र जनावरांनाही चॉकलेट आणि लाडू आवडतात. ते खाल्ल्यावर त्यांची प्रजनन क्षमता आणि दुग्ध उत्पादकता वाढते, हे वाचून आश्चर्य वाटेल, पण सत्य आहे.
जितेंद्र ढवळे
नागपूर : चॉकलेट अन् लाडू सामोर आल्यावर ते खाण्याचा मोह सर्वांनाच होतो! मात्र जनावरांनाही चॉकलेट आणि लाडू आवडतात. ते खाल्ल्यावर त्यांची प्रजनन क्षमता आणि दुग्ध उत्पादकता वाढते, हे वाचून आश्चर्य वाटेल, पण सत्य आहे.
मनुष्याला आहारात जशी पोषक तत्त्वे लागतात तोच नियम जनावरांनाही लागू पडतो. याच पार्श्वभूमीवर राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई आणि नागपुरातील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशू आहार शास्त्र विभागाच्या वतीने फिड टेक्नॉलॉजी युनिट पशुधन संशोधन तथा पशू पैदास प्रक्षेत्र येथे स्थापन करण्यात आले आहे. येथे जनावरांच्या डायटवर नवं संशोधन सुरू आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांसाठी खास चॉकलेट, लाडू आणि पोषक आहार येथे बनविला जातो. यासोबतच जनावरांच्या या आहारशास्त्रातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी पहिल्या बॅचमध्ये १० जणांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुंवर आणि विभागप्रमुख डॉ. सुधीर कवीटकर यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन कार्य सुरू आहे.
कसे बनतात चॉकलेट अन् लाडू
फिड टेक्नॉलॉजी युनिटमध्ये पशू आहार तयार करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात लाडू अन् चॉकलेट बनविताना गव्हाचा कोंडा, उसाची मळी, युरिया आणि चुनखडीचे विशिष्ट मिश्रण तयार केले जाते. शास्त्रीय पद्धतीने मशीनच्या सहायाने ही प्रक्रिया राबविली जाते.
काय आहे कांडी खाद्य?
पारंपरिक शेळीपालनात जनावरांचे वजन वाढण्यासाठी बराच कालावधी लागतो. मात्र या ठिकाणी शेळ्यांच्या आहारासाठी विशेष कांडी खाद्य तयार करण्यात आले आहे. या खाद्यामुळे शेळीचे ९ महिन्यातच वजन ३० किलो इतके होते. या कांड्या तयार करण्यासाठी ६० टक्के कुटारासोबत ढेप, मका, चुनी आणि चोकर या घटकांचा आधार घेतला जातो. यातून शेळीपालकांना नव्या रोजगारासह उत्पन्नही मिळू शकते. वर्धा जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
फिड टेक्नॉलॉजी युनिटमध्ये पशूंच्या आहार निर्मितीसोबत त्यांच्या डायटवर सातत्याने संशोधन सुरू आहे. यातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, यावरही भर देण्यात आला आहे. यासाठी १० जणांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्याची गरज लक्षात घेता, या रोजगारातून महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न सहज मिळणे शक्य आहे.
- डॉ. अतुल ढोक, सहायक प्राध्यापक,
पशू पोषण आहारशास्त्र विभाग, पशू वैद्यक महाविद्यालय, नागपूर