विकास कामांना गती देऊन शहराला स्मार्ट करा : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:30 AM2020-03-19T00:30:22+5:302020-03-19T00:31:57+5:30
विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका अर्थसंकल्पात‘फ्युचर सिटी’ची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेश लिमिटेड(एनएसएससीडीसीएल)च्या माध्यमातून विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शहरातील बाजार भागांचा विकास करण्याची गरज आहे. शहरातील पाच बाजार भाग विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार करा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मनपाच्या शहर बसस्थानकावर स्मार्ट किऑक्स लावण्यात आले आहेत. या किआॅक्सवर ५० प्रकारच्या नागरी सुविधा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापूर येथे कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असून सर्व कामांना गती द्या, तसेच भांडेवाडी येथील बायोमायनिंग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले.
पार्किंग आरक्षणाचा अहवाल सादर करा
शहरातील वाढती वाहनांची संख्या विचारात घेता मल्टीलेव्हल कार पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी शहराच्या विविध भागातील पार्किंग आरक्षणाचा अभ्यास करून विस्तृत अहवाल सादर करा, शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी पब्लिक बाईक शेअरिंग सिस्टीम सुरू करण्यात यावी. ही संपूर्ण प्रणाली मोबाईल अॅपवर उपलब्ध करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले.