ई-वे बिलाची मर्यादा पाच लाख करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:25 PM2018-06-20T23:25:12+5:302018-06-20T23:27:08+5:30
राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजारांवरून पाच लाखांवर नेण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने (फॅम) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजारांवरून पाच लाखांवर नेण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने (फॅम) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी राज्यमंत्री राज पुरोहित उपस्थित होते.
फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि ई-वे बिलाची प्रक्रिया सरळसोपी करण्याची मागणी केली. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांनी मर्यादा ५० हजारांवरून एक लाखापर्यंत वाढविली आहे. गुजरात राज्यात केवळ १९ वस्तूंना ई-बिलाच्या टप्प्यात बंधनकारक केले तर उर्वरित वस्तूंना सूट दिली आहे. दोन ते तीन राज्यांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीला ई-वे बिलातून सूट दिली आहे. अशीच सूट राज्य शासनाने द्यावी.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अन्य राज्यांनी ई-वे बिलाच्या मर्यादेत केलेल्या बदलांवर जीएसटी कौन्सिलने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एक राष्ट्र एक कर अशी संकल्पना आहे. संघटनेची मागणी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत उचलून धरणार आहे. ई-वे बिलामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. राज्यांतर्गत माल पाठविण्यासाठी टेक्सटाईल उद्योगाचा विचार करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.
शिष्टमंडळात फॅमचे महासचिव आशिष मेहता, सचिव प्रीतेश शाह, कमलेश शाह, परेश कडकिया, निमित शाह, उपाध्यक्ष राजेंद्र भालरिया, कोषाध्यक्ष उत्तम जैन, कार्यकारिणी समिती सदस्य राजेश जोशी, किशोर शाह, समीर कनकिया, नीलेश शाह आणि असोसिएशनच्या अन्य सदस्यांचा समावेश होता.