जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करा; नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By आनंद डेकाटे | Updated: July 28, 2024 19:18 IST2024-07-28T19:18:37+5:302024-07-28T19:18:50+5:30
आवश्यक उपाय योजनांसह रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्याच्या सूचना

जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करा; नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले.
रवी भवन सभागृहात नागपूर झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. हर्ष पोद्दार उपस्थित होते.
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ॲम्बुलन्सच्या आतच अपघातग्रस्त वाहनातून वाहनाचे भाग कापून जखमींना बाहेर काढण्याची सोय असावी. तसेच त्वरित वैद्यकीय मदत घटनास्थळीच मिळण्यासाठीचा एक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देता यावा. यादृष्टीने वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून यंत्रणा तयार करावी. जेणेकरून अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल, अशी सूचनाही गडकरी यांनी केली.
- फुटपाथ मोकळे करा, अतिक्रमण काढा
शहरातील फुटपाथ मोकळे नसल्यामुळे खूप अपघात होतात. त्यामुळे अशा फुटपाथवरील अतिक्रमण पोलिस संरक्षणात कडक कारवाईने मोकळे करावे. तसेच ज्या फुटपाथवर पक्के बांधकाम आहे ते सुद्धा काढून टाकण्याचे निर्देश गडकरी यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले. पार्किंगच्या नियमांची धास्ती लोकांना व्हावी याकरिता नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देशही गडकरी यांनी यावेळी दिले.
- गेल्या वर्षी शहरात ३०८ तर ग्रामीणमध्ये ४४० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘सेव लाईफ’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रविण तिवारी यांनी नागपूर ग्रामीण आणि शहरात घडलेल्या रस्ते अपघातांची तसेच त्यावर संबंधित यंत्रणेला सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागपूर ग्रामीणमध्ये गेल्या वर्षी ४४० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यावर्षी अपघाताच्या संख्येत ४ टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्यावर्षी नागपूर शहरात ३०८ मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.