दात घासण्यासारखे बाहेरून आल्यावर नाक धुण्याची सवय लावा - डॉ. सुंदीप साळवी
By सुमेध वाघमार | Published: December 3, 2023 06:32 PM2023-12-03T18:32:33+5:302023-12-03T18:33:08+5:30
वायुप्रदूषण ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या बनली आहे.
नागपूर: वायुप्रदूषण ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या बनली आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही अलीकडे वायुप्रदूषणाने चिंता वाढवली आहे. वायुप्रदूषणाच्या हानिकारक प्रभावापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी जसे दररोज तुम्ही दात घासता तसे बाहेरून घरी आल्यावर कोमट पाण्याने नाक धुण्याची सवय लावा, असा सल्ला इंडियन चेस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुंदीप साळवी यांनी दिला.
इंडियन चेस्ट सोसायटीच्या वतीने शनिवारी आयएमए सभागृहात आयोजित ह्यवायुप्रदूषण आणि आरोग्यह्ण या विषयावर चर्चासत्रात मुख्य वक्ते म्हणून डॉ. साळवी बोलत होते. यावेळी मेयोच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. राधा मुंजे, संगीता गोयल घाटगे उपस्थित होत्या. संचालन डॉ. राजेश स्वर्णकार यांनी केले. वायुप्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर विशेषत: फुप्फुसावर विपरीत परिणाम होतो. यामुळे रुग्णांमध्ये अस्थमा आणि सीओपीडीचा त्रास वाढण्याबरोबरच ब्राँकायटिसचा धोका होऊ शकतो, असे डॉ. स्वर्णकार म्हणाले.
...तर घरातही मास्क वापरा
डॉ. साळवी म्हणाले, बाहेर प्रदूषणाची पातळी खूप जास्त असेल किंवा घरच वायुप्रदूषणाचे स्रोत असेल तर, घरामध्ये ह्यथ्री लेयर्ड मास्क वापरा. नियमित व्यायाम करा. चालणे हा फुप्फुसासाठी तसेच हृदयासाठी खूप चांगला व्यायाम आहे. ३० मिनिटे ते १ तास हे दररोजचे चालण्याचे लक्ष्य असावे. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने फुप्फुसे निरोगी राहतात. परंतु हे करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वायुप्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या
डॉ. राधा मुंजे म्हणाल्या, वायुप्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी व वायुमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या फुप्फुसांना भरपूर पाण्याची गरज असते. यामुळे भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ प्या. कोरडे फुप्फुसे वायुप्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांसाठी अधिक असुरक्षित बनवतात.