दुधाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करणार; दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:34 PM2017-12-12T18:34:42+5:302017-12-12T18:35:16+5:30
राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्यां शेतकऱ्यांना दूध उत्पादक संस्थांकडून दुधाला वेगवेगळे दर दिले जातात. शासनाने निश्चित केलेले दूध खरेदी दर हे शासन व सहकार क्षेत्राकरिता लागू आहेत. मात्र खासगी क्षेत्राच्या दूध खरेदी व विक्री दरावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी दूध क्षेत्राकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे दर दिले जातात, अशी माहिती जानकर यांनी दिली.
दुधाला हमीभाव मिळावा, अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये अंतर्भूत आहे. या अधिनियमातील कलम ३(२)(क) येथील तरतुदीनुसार जीवनावश्यक पदार्थांसाठी किमान आधारभूत खरेदी दर निश्चित करण्याचे अधिकार केंद्र शासनाला असल्याची माहिती जानकर यांनी लेखी उत्तरात दिली.