संविधानाचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:51 PM2019-03-15T15:51:33+5:302019-03-15T15:52:09+5:30
संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे.
संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे, तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन खोब्रागडे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून अर्थसंकल्पात तरतूद करून त्याच वित्तीय वर्षात योजनांवर खर्चाबाबत धोरण असेल तर सरकारकडून त्याचे पालन होत नाही. प्राप्त निधी पूर्ण खर्च होत नाही. या समाजावर अन्याय होणार नाही. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात अनुसूचित जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याचा मुद्दा समाविष्ट करावा, असेही खोब्रागडे यांनी म्हटले आहे.
संविधानाची शपथ घेऊन कार्य करणारे लोकप्रतिनिधी, कार्यकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, न्याायालये, संविधानाशी एकनिष्ठ होऊन आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. तसेच नागरिकसुद्धा आपल्या कर्तव्यांचे पालन संविधानानुसार करीत नाही. म्हणून यासाठी विशेष कायदा करण्यात यावा व उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. शिस्तप्रिय नागरिक व देशहित साधण्यासाठी हे आवश्यक आहे.
न्यायालयाच्या स्वायत्ततेसाठी अखिल भारतीय न्यायिक सेवा कायदा करून त्यात समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करा. पदोन्नतीमध्ये आरक्षण आणि अनुशेष भरतीबाबत कायदा करा, संविधान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करा, मागास विद्यार्थ्यांना वेळीच शिष्यवृत्ती मिळेल अशी व्यवस्था करा, आदी मागण्याही खोब्रागडे यांनी केल्या असून या सर्व मुद्यांचा सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, असे आवाहन केले आहे.