मेक माय ट्रीप @ ४० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:53 PM2019-08-29T19:53:19+5:302019-08-29T19:54:32+5:30
कोल्हापूरला जाण्यासाठी मेक माय ट्रीपच्या माध्यमातून बस तिकीट काढणाऱ्या एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने ४० हजारांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज
नागपूर : कोल्हापूरला जाण्यासाठी मेक माय ट्रीपच्या माध्यमातून बस तिकीट काढणाऱ्या एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने ४० हजारांचा गंडा घातला. झारखंडमधील जामतारा येथील सायबर गुन्हेगाराने हा प्रकार चालविल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
ग्यानचंद्र मुरलीधर हेमनानी (वय ५१)जरीपटक्यातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना कोल्हापूरला जायचे होते. त्यासाठी त्यांनी ९ जुलैला दुपारी २.३८ वाजता पुणे ते कोल्हापूर असे बसचे तिकीट मेक माय ट्रीपच्या माध्यमातून ऑनलाईन बूक केले. त्यानंतर काही कारणामुळे त्यांनी हे तिकीट रद्द केले. परंतु तिकिटाचे पैसे परत मिळाले नाही म्हणून हेमनानी यांनी १९ जुलैला मेक माय ट्रीपच्या कस्टमर केअरवर मोबाईलने संपर्क केला. यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करतो, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरून दोन लिंक पाठविण्यास सांगितले. हेमनानी यांनी त्या पाठविल्या असता त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या (शाखा जरीपटका) खात्यातून यूपीआय द्वारे ४० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज त्यांना मिळाला. हेमनानी लगेच बँक आणि पोलिसांसोबत संपर्क साधला असता त्यातील पाच हजार रुपये जामतारा (झारखंड) येथील एटीएममधून काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हेमनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.