व्यसनमुक्तीसाठी युवकांनी समाज जागृती करावी
By Admin | Published: March 19, 2017 03:03 AM2017-03-19T03:03:33+5:302017-03-19T03:03:33+5:30
तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक असून ‘तंबाखू सेवन व उत्पादन’ नियंत्रित होणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळा
नागपूर : तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक असून ‘तंबाखू सेवन व उत्पादन’ नियंत्रित होणे आवश्यक आहे. व्यसनमुक्तीसाठी युवकांनी समाज जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेयो रुग्णालय येथे आयोजित कार्यशाळेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यू. बी. नावाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कुर्वे म्हणाले, जगामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूचे उत्पादन करण्यात येते. यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच तंबाखू सेवनामध्ये देखील आपला देश आघाडीवर आहे. ही बाब चिंतनीय आहे.
तंबाखू, सिगरेट यासारख्या अमली पदार्थाच्या सेवनाविरोधात कायदे असून त्याचा परिणामकारक प्रसार व प्रचार आवश्यक आहे. तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांची जाणीव हळूहळू समाजामध्ये होत आहे. तंबाखूविरोधी जनजागृती, तंबाखू उत्पादन व सेवन नियंत्रित व्हावे याकरिता अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी शिक्षण विभाग, पोलीस विभाग (शहरी व ग्रामीण), अन्न व औषधी प्रशासन विभाग, वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी, एन. जी. ओ., इतर शासकीय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यू.बी. नावाडे यांनी केले. संचालन अमोल खोब्रागडे यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लतिका गरुड यांनी मानले.(प्रतिनिधी)