Coronavirus in Nagpur; रोज काही नवीन करण्याचे बनवा प्लॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:16 PM2020-03-26T12:16:19+5:302020-03-26T12:16:48+5:30
दररोज काही नवीन प्लॅनिंग केले तर प्रत्येक दिवस नवीन वाटेल आणि बोरिंग वाटणार नाही. वेळही चांगला जाईल आणि मुलांनाही नवीन काही शिकायला मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे २१ दिवस घरात राहण्याचा विचार अनेकांसाठी कंटाळवाणा वाटायला लागला आहे. त्यामुळे ‘बोर’ होते आहे, ही सामान्य प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळते. मात्र या लॉकडाऊनचा काळ हा रचनात्मक कार्यासाठी लावला जाऊ शकतो, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दररोज काही नवीन प्लॅनिंग केले तर प्रत्येक दिवस नवीन वाटेल आणि बोरिंग वाटणार नाही. वेळही चांगला जाईल आणि मुलांनाही नवीन काही शिकायला मिळेल. केवळ स्वत:ला कैद झाल्यासारखे वाटू देऊ नका व सकारात्मक भाव मनात ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी राज्य व केंद्र शासनातर्फे पावले उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासन त्या आदेशांची अंमलबजावणी करीत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पोलिसांकडूनही सक्तीने या आदेशाचे पालन केले जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरात स्वत:ला सुरक्षित ठेवत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. हा पहिलाच अनुभव आहे जेव्हा एवढ्या लांब काळासाठी बहुतेकांवर घरात राहण्याची पाळी आली आहे. ही परिस्थिती लोकांवर मानसिक प्रभाव पाडणारी आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी संयम कसा बाळगावा, असे लोकांच्या मनात प्रश्न आहेत. याबाबत लोकमतने शहरातील मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा करून लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते इतके दिवस घरात राहणे लोकांची मानसिक परीक्षा घेण्यासारखे आहे. त्यांच्या स्वभावात बदल होतो. मनावर तणाव व निराशा पसरण्याची शक्यताही आहे. मात्र या स्थितीपासून स्वत:ला वाचविले जाऊ शकते, असा विश्वास मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
- बोअर होण्यापासून वाचू शकता
डॉ. राजा आकाश यांनी सांगितले, २१ दिवस घरात राहिल्याने कंटाळा येणे स्वाभाविक आहे. काही दिवसानंतर तणाव आणि निराशा पसरण्याची भीती आहे. चिडचिड होईल आणि लहानसहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यताही आहे. मात्र ही स्थिती टाळली जाऊ शकते. यासाठी आवश्यक आहे स्वत:ला घरातील कामात व्यस्त करणे. एखाद्या व्यक्तींवर घराचे काम टाकण्याऐवजी सर्वांनी मिळूनमिसळून ते पूर्ण करावे. मोबाईलवर अधिक वेळ घालविण्यापेक्षा सर्वांसोबत वेळ घालविणे चांगले आहे. घरातील सदस्य एकमेकांसोबत संवाद साधतील तर वेळ कसा निघून जाईल समजणारही नाही. संवाद आणि मायक्रो प्लॅनिंग करून स्वत:ला बोर होण्यापासून आणि तणाव पसरण्यापासून वाचविले जाऊ शकते.
कौशल्याचा कोर्स करा
मनोरुग्णालयाचे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. अक्षय सरोदे यांनी सांगितले, उद्योजक, लहानमोठे व्यवसायी आणि शेअर मार्केटशी संबंधित लोकांसाठी हा काळ सर्वात कठीण आहे. सामान्य नागरिकांनाही तणावाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी एखादा कौशल्य अभ्यासक्रम शिकणे व स्वत:ला विकसित करणे गरजेचे आहे. कोणताही कोर्स विकसित करण्यासाठी २१ दिवसाचा वेळ निश्चित लागतो. त्यामुळे लॉकडाऊन शिक्षा किंवा बंदी केल्यासारखे समजू नका. सकारात्मकतेने घ्या, असे आवाहन डॉ. सरोदे यांनी केले.
- मुलांची विशेष काळजी घ्या
डॉ. विवेक चंदनानी यांच्या मते मनात भीतीची भावना येऊ नये म्हणून सर्वात चांगला पर्याय आहे वृत्तवाहिन्यांच्या बातम्या कमीत कमी बघाव्या. यावेळी जवळपास सर्वच वाहिन्यांवर कोरोना विषाणू संबंधित बातम्या सुरू आहेत. या बातम्या पाहून मनात भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: मुलांमध्ये ही शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी वातावरण आरोग्यदायी ठेवणे गरजेचे आहे. मुलांसोबत कोरोना विषाणूच्या भीतीच्या गोष्टी करू नये. त्यापेक्षा ज्ञानवर्धक गोष्टी कराव्या. त्यांना काही नवीन करण्यासाठी प्रेरित करा. काही नवीन शिकण्यावर भर द्या. मुलांसोबत स्वत:ही या गोष्टी आत्मसात करा. घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. त्यांना चर्चांमध्ये सहभागी करा.
या गोष्टी करा
- माध्यमातील भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून दूर रहा
- सोशल मीडियावर व्हायरल होणाºया संदेशाबाबत आधी शहानिशा करा.
- १०-१० मिनिटांनी व्यायाम, योग, ध्यानसाधना यासारख्या शारीरिक गोष्टी करा.
- मुलांना सर्वकाही सुरक्षित असल्याचे सांगा, भीतीच्या गोष्टी करू नका.
- स्वत:ला चिंतामुक्त ठेवा. मनात भीतीची भावना येऊ देऊ नका.
- मुलांना बोलू द्या. त्यांच्या प्रश्नांचे तार्किक उत्तर द्या.
- काही चांगल्या सवयी आत्मसात करा.
- दिनचर्या संयमित व नियमित ठेवा.
- आहार संतुलित ठेवा.
- प्रेरणा, ऊर्जा व आत्मविश्वास वाढविणारे चित्रपट बघा किंवा पुस्तके वाचा.
- अफवांपासून सावध रहा.