पारडी येथे आठवडी बाजाराला जागा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:29 AM2017-09-16T00:29:59+5:302017-09-16T00:32:21+5:30

पूर्व नागपुरात पारडी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्यांच्या बाजूलाच बाजार भरतो.

Make room for the weekend at Pardi | पारडी येथे आठवडी बाजाराला जागा उपलब्ध करा

पारडी येथे आठवडी बाजाराला जागा उपलब्ध करा

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा सभागृहात मागणी : महापौरांचे बाजार धोरण तयार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरात पारडी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्यांच्या बाजूलाच बाजार भरतो. यामुळे अपघात होत असल्याने पारडी भागात आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी केली. भाजपाचे प्रदीप पोहाणे यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी प्रश्नोेत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापौर नंदा जिचकार यांनी या मागणीची दखल घेत प्रशासनाला या भागाची पाहणी करून अहवाल सादर सादर करा, तसेच आरक्षित जमीन अधिग्रहित करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिले. पारडी उड्डाण पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे.
यामुळे नागरिकांना त्रास होतो. बाजूलाच बाजार भरतो. पर्याय नसल्याने नागरिकांना खरेदीसाठी बाजारात जावे लागत असल्याचे हजारे यांनी निदर्शनास आणले. सरस्वती तलमले यांची पाच एकर जमीन आहे. या जागेवर शाळा, हॉस्पिटल व दहन घाटाचे आरक्षण आहे. यातील चार एकर जागा बाजारासाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नासुप्रच्या चुकीच्या धोरणामुळे या भागाचा विकास रखडला. शहर अभियंता यांना मंजुरीचे अधिकार मिळावे. तर नगररचना विभागाच्या अधिकाºयांवर सुनियोजित विकासाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली.
फक्त ९९६० डस्टबिनचे वाटप
नागपूर शहरात आजवर फक्त ९९६० डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे. तसेच १८,९६६ घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. बंटी शेळके यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. डस्टबिन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या ई-पोर्टलवर अर्ज करण्यात आला आहे. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ई-निविदा काढून डस्टबिनची खरेदी केली जाणार असल्याची माहिती दासरवार यांनी दिली.
ऐवजदारांचा प्रस्ताव शासनाकडे
गेल्या अनेक वर्षांपासून ऐवजदार सफाईचे काम करीत आहेत. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. त्यांना नोकरीत कायम करण्यात यावे. अशी मागणी काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी केली. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनीही या मागणीचे समर्थन क रीत याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. दोन दिवसापूर्वी महापौरांनी या संदर्भात पत्र पाठविले आहे. यात आकृतीबंधाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ओसीडब्ल्यूचे कार्यालय
बुद्धपार्क , बुद्धनगर येथे ८०.२५ लाखांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये खेळाडूंना खेळता येत नाही. हे कार्यालय ओसीडब्ल्यूला कार्यालयासाठी देण्यात आले आहे. ओेसीडब्ल्यूचे कार्यालय आधी आसीनगर झोन कार्यालयात होते. बसपाचे माजी सभापती यांच्या पत्रानुसार कार्यलय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. यावर काँग्रेसचे संदीप सहारे यांनी आक्षेप घेतला. यावर महापौरांनी पाहणी करून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रभावीपणे राबवा
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी २०१५ मध्ये ३०० चौ.मीटर पेक्षा अधिक बांधकामासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु या निर्णयाची अंमलबाजवणी प्रभावीपणे होत नाही. रेनवॉटर हार्वेस्टिग योजनेचा केवळ ६८ लोकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक निशांत गांधी यांनी केली. मागणीनुसार उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
२२० कर्मचारी पण ४० करतात काम
प्रभाग २३ मध्ये २२० सफाई कर्मचारी आहेत. परंतु प्रत्यक्षात कामावर ३५ ते ४० कर्मचारी दिसतात. हा प्रकार थांबला पाहिजे. अशी मागणी भाजपाचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी केली. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनी सफाई कर्मचाºयांचा प्रश्न उपस्थित केला होता. आसीनगर झोनमध्ये कर्मचारी कमी आहेत. शहरातील लोकसंख्येच्या निकषावर सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. अशी मागणी केली.
खाली प्लॉटवरील कचरा उचला
खाली प्लॉटवरील कचºयासंदर्भात उपनियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळेपर्यंत अशा प्लॉटवरील कचरा उचलण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरात २२८९० खाली प्लॉट आहेत. यातील २६१३ प्लॉटवर कचरा साचल्याच्या तक्रारी आल्या. यातील ४१६ प्लॉटवरील कचरा उचलण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. विजय झलके यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Make room for the weekend at Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.