रोजीरोटी करावी की शासकीय नियमांचे पालन?
By admin | Published: July 8, 2017 02:09 AM2017-07-08T02:09:41+5:302017-07-08T02:09:41+5:30
जुना सुभेदार येथील दुर्गानगर माध्यमिक शाळेत येणाऱ्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर काढला.
गणवेशाच्या जटिल नियमावरुन पालकांचा सरकार आणि मनपा प्रशासनाला सवाल : लोकप्रतिनिधी घेणार का दखल ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुना सुभेदार येथील दुर्गानगर माध्यमिक शाळेत येणाऱ्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर काढला. अनेक पालकांना सकाळीच उठून कामासाठी बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना बँकेत खाते काढण्यासाठी लाईनमध्ये उभे राहून वेळ घालणे शक्य होत नाही. याशिवाय ६०० रुपयांच्या गणवेशासाठी ५०० आणि १००० रुपये खर्च करणे ही बाबही त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे रोजीरोटी करावी की शासकीय नियमांचे पालन करावे, असा प्रश्नही अनेक पालकांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध नाराजीचा सूर काढला.
विवेकानंदनगर हिंदी उच्च प्रा. माध्यमिक शाळा
विकासनगर येथील विवेकानंदनगर शाळेत सकाळच्या सत्रात १ ते ४ वर्ग व बालवाडी भरते. जवळपास ४५० विद्यार्थी सकाळच्या सत्रात शिक्षण घेतात. शुक्रवारी या शाळेला भेट दिली असता, बालवाडी व पहिल्या वर्गातील विद्यार्थी गणवेशाविना शाळेत आले होते. इतर वर्गात विद्यार्थ्यांचे गणवेश होते. परंतु ते मागच्या वर्षीचे होते. शाळेत विचारणा केली असता, गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने आतापर्यंत गणवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे जुना गणवेश आहे, ते गणवेश घालून येतात. परंतु बालवाडी व पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश झाल्याने गणवेश नसल्यामुळे ते विनागणवेश शाळेत येत आहेत.
१५ आॅगस्टच्या आत गणवेश मिळतील
आमच्या शाळेत साधारणत: गरीब, मजूर, कामगार वर्गाचे विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान मिळणार असल्याने आम्ही सुरुवातीपासून त्या कामाला लागलो. शिक्षकांनी जवळच्याच युनियन बँक, कॅनरा बँकेशी संपर्क साधला. आम्हाला आलेल्या सूचनेनुसार एक पत्र तयार करून, बँकेच्या मॅनेजरला दिले. त्यांनी शून्य बॅलेंसवर खाते उघडण्यास होकार दिल्याने, मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून कागदपत्राची मागणी केली. आतापर्यंत जवळपास ९० टक्के खाते आम्ही उघडले आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांचे खाते लवकरच पूर्ण होईल आणि १५ आॅगस्टच्या आता त्यांना गणवेश देऊ.
- रजनी वाघाडे, मुख्याध्यापिका