मूर्ती घेतांना मातीचीच असल्याची खात्री करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:31+5:302021-09-10T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज शुक्रवारी श्री गणेशाचे आगमन होत आहे. पीओपी मूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज शुक्रवारी श्री गणेशाचे आगमन होत आहे. पीओपी मूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मूर्ती घेतांना ती मातीचीच आहे याची खात्री करूनच घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा दुसरा गणेशोत्सव आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. पीओपी मूर्ती खरेदी आणि विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सर्वांनी याबाबत सजग राहणे आवश्यक. आपण विकत घेत असलेली मूर्ती पीओपीची नसून ती शाडू मातीची आहे, याची खात्री करून घ्यावी. असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य देऊन मातीच्याच मूर्तीची स्थापना करा, असे आवाहन केले आहे.
...
मंडळांनी जनजागृती करावी
श्री गणेशोत्सव म्हणजे श्रद्धेचा उत्सव आहे. सामाजिक जनजागृतीचा उत्सव आहे. या उत्सवातून गणेश मंडळांनी डेंग्यू, कोरोना नियमांचे पालन, लसीकरण याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. सोबतच ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घेत कोरोना नियमावलीचे पालन करीत हा गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करा, असेही आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
....
आयुक्तांचे आवाहन
-मातीच्याच मूर्तीची स्थापना करा.
-घरगुती मूर्ती दोन फुटांहून अधिक नसावी.
-सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फुटांहून अधिक उंच नसावी.
-घरच्या गणेशाचे घरातच विसर्जन करा.
- शहरातील तलावावर विसर्जन होणार नाही.
- कृत्रिम विसर्जन कुंडातच गणेश मूर्तीचे विसर्जन करा