भाजपा विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:06 PM2019-01-13T22:06:41+5:302019-01-13T22:07:09+5:30

येत्या निवडणुकांत जनतेनेच सरकारविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा रविवारी नागपुरात समारोप झाला.

Make 'surgical strike' against BJP; Ashok Chavan appealed | भाजपा विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

भाजपा विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा सर्व पातळ््यांवर अपेक्षाभंगच केला आहे. संविधान बदलण्याचा घाट घातलेल्या सरकारने व त्यांच्या विचारधारेने देशाचे वाटोळे केले आहे. येत्या निवडणुकांत जनतेनेच सरकारविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा रविवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.
पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना पोलीस लॉन येथे झालेल्या या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, सचिव आशिष दुवा, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मागील पाच वर्षांत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. मतांसाठी भाजप नेते महात्मा गांधी यांचा गजर करत आहेत. मात्र त्यांना महात्मा गांधी यांची आठवण येत आहे की नथुराम गोडसेची हे एक कोडेच आहे. भाजपचे नेते उखडून फेकण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसने मात्र कधीही अशी भाषा वापरली नाही. देशात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशदेखील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. इतकेच काय तर साहित्य संमेलनात साहित्यिकांनाच येण्यास सरकार मनाई करत आहे. यासारखी दुर्दैवाची बाब नाही. सरकार लोकशाहीची विटंबनाच करत आहे. निवडणुका जवळ येत असताना भाजपाकडून जनतेला घोषणा करून नवीन गाजर दाखविण्यात येईल. मात्र जनतेने सावध व्हायला हवे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
मुत्तेमवार यांनी ‘मेट्रो रेल्वे’ चे क्रेडिट घेण्याचा भाजपा प्रयत्न करीत असल्याची टीका केली. यावेळी प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, सरचिटणीस डॉ.बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, माजी आ. आशिष देशमुख, प्रफुल्ल गुडधे, प्रवक्ते अतुल लोंढे, रामकिशन ओझा, उमाकांत अग्नीहोत्री, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, किशोर गजभिये, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले तर विशाल मुत्तेमवार यांनी संचालन केले.

पांडे, चव्हाण यांनी टोचले नेत्यांचे कान
- जाहीर सभेत बोलताना अविनाश पांडे तसेच अशोक चव्हाण या दोघांनीही शहरातील काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. तीन राज्यांच्या निकालातून जनतेने केंद्र सरकारला बदलाचा इशारा दिला आहे. मात्र लोकसभेचे आव्हान मोठे आहे. अशा स्थितीत नेत्यांनी ‘मी’ पणा विसरायला हवा. काँग्रेस पक्ष भाषणांनी मजबूत होणार नाही. सर्वांनी एकोपा ठेवून काम करायला हवे, असा सल्ला अविनाश पांडे यांनी दिला. तर लोकसभा निवडणुका हे एकप्रकारे वैचारिक युद्धच आहे. यात सर्वांनी एकत्र मिळून हातभार लावायला हवा. कोण मोठा, कोण लहान हा विचार न करता एकोप्याने काम करा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली.


सातवेळा झाले महात्मा गांधींना मारण्याचे प्रयत्न
यावेळी उल्हास पवार यांनी संघ व हिंदू महासभेवर आरोप केले. संघ व हिंदू महासभेने सातवेळा महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न केले. गांधींचे फोटो लावण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर १८ वेळा ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता. १९२५ नंतर ते एकदाही रत्नागिरी जिल्ह्याबाहेर पडले नाही व एकही आंदोलन केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९४२ च्या आंदोलनात नऊ दिवस कारावास भोगल्यावर इंग्रजांची माफी मागितली व पुढे ते कधीही तुरुंगात गेले नाही, असा दावा पवार यांनी केला.
या वेळी माजी आ. यशवंत बाजीराव, मुकुंदराव पन्नासे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, गिरीश पांडव, दीपक वानखेडे, अभिजित सपकाळ, राजू भोतमांगे, प्रमोदसिंग ठाकूर, युगलकिशोर विदावत, राजेश पायतोडे, ओवेस कादरी, सुभाष मानमोडे, बापु बरडे, राम कळंबे, त्रिशरण सहारे, विवेक निकोसे, नंदा पराते, हरीश ग्वालबंसी, नितीश ग्वालबंसी, अरुण डवरे, राजेश नगरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Make 'surgical strike' against BJP; Ashok Chavan appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.