कायद्याची दहशत निर्माण करा!
By admin | Published: May 15, 2016 02:50 AM2016-05-15T02:50:55+5:302016-05-15T02:50:55+5:30
नागपूर शहरात ज्याप्रमाणे कायद्याची दहशत निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे कामठी शहरासह तालुक्यात कायद्याचे ...
देवेंद्र फडणवीस : कामठी, जुनी कामठी, हिंगणा ठाण्याचे पोलीस आयुक्तालयात विलिनीकरण
कामठी : नागपूर शहरात ज्याप्रमाणे कायद्याची दहशत निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे कामठी शहरासह तालुक्यात कायद्याचे राज्य निर्माण करून कामठीला गुन्हेगारीमुक्त करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कामठी, कामठी (जुनी) व हिंगणा पोलीस ठाण्याचे नागपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत विलिनीकरण करण्यात आले. या ठाण्यांचा हस्तांतरण सोहळा कामठी येथे शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते तर, प्रमुख अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, सहआयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त तरवाडे, कदम उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आधुनिकीकरणामुळे गावांचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे शहरांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांची आव्हाने गावांनाही सोसावी लागतात. याला कामठी शहर अपवाद नाही. कामठी शहर व तालुका गुन्हेगारीमुक्त व्हावा, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कामठी पोलीस ठाण्याचा समावेश नागपूर पोलीस आयुक्तालयात करण्याची मागणी केली होती. ती या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जामठा येथील व्हीसीए, मिहान, पोलीस आयुक्तालयात नियंत्रणात यावे, असे आधीपासूनच वाटत होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक आहे.
कामठी शहर व तालुक्याचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्यात आल्याचा आनंद आहे. परिणामी, कामठी शहर व तालुका आता गुन्हेगारीमुक्त होईल. नागपूर शहराप्रमाणेच पोलीस आयुक्तांची टीम आता लवकरच कामठी गुन्हेगारीमुक्त करण्यास यशस्वी होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी खा. कृपाल तुमाने व सुलेखा कुंभारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कामठी शहराचा समावेश झोन-५ मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे झोन-५ चे पोलीस उपायुक्त अविनाशकुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टुरिस्ट पोलीस व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
गुंडांना राजकीय आश्रय देऊ नका
पूर्वी नागपूर शहराकडे गुन्हेगारी असलेले शहर म्हणून बघितले जायचे. नागपूर पोलीस आयुक्तालय टीमने गेल्या दोन - तीन महिन्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. परिणामी, नागपुरातील गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आली असून, त्यांच्यावर कायद्याची दहशत निर्माण झाली आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. कारण, गुंडांना जेरबंद करण्याचे काम या टीमने केले. कामठीचा समावेश अतिसंवेदनशील शहरांच्या यादीत होतो. आता कामठी शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत आल्याने येथील गुंडांचा बीमोड करून कामठी गुन्हेगारीमुक्त करू. गुंड नेहमी राजकीय आश्रय मिळवण्याचा प्रयत्नात असतात. त्यांना राजकीय आश्रय मिळाला नाही तर, कामठी तालुका निश्चितच गुन्हेगारीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
---------------------
नागपूर पोलिसांचे आधुनिकीकरण
नागपूर शहरात पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या इमारती, सहा नवीन पोलीस ठाणे, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे ही सर्व कामे लवकरच पूर्णत्वास नेली जातील. जिल्हा नियोजन समितीचे अंदाजपत्रक पूर्वी १५० कोटी रुपयांचे होते. मुख्यमंत्र्यांनी ते अंदाजपत्रक आता ३५० कोटी रुपयांचे केले आहे. शिवाय, निधीही उपलब्ध करून दिला.अब्दुल्ला शहा दर्ग्याला दोन कोटी रुपये व ड्रॅगन पॅलेस टेम्पलला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. बौद्ध उपासकांसाठी बुद्धिस्ट सर्किट तयार केले जात आहे. भविष्यात कामठी नगर परिषदेला मुख्यमंत्र्यांनी ‘अ’ दर्जा द्यावा तसेच दुसऱ्या टप्प्यात मेट्रो कन्हान - कामठीपर्यंत आणावी, अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.