‘वसुधैव कुटुंबकम’ प्रत्यक्षात आणा, आफ्रिकेतील मुलांवरील अन्याय दूर करा
By योगेश पांडे | Published: March 21, 2023 04:43 PM2023-03-21T16:43:17+5:302023-03-21T16:45:54+5:30
नागपूरच्या भूमीतून ‘सी-२०’मध्ये मान्यवरांचे आवाहन : मानवी मूल्यांच्या संवर्धनाच्या ‘रोडमॅप’ची गरज
नागपूर :नागपूरची भूमी ही सामाजिक परिवर्तनाची जननी म्हणून ओळखली जाते व याच शहरात सुरू असलेल्या ‘सी-२० समिट’दरम्यान हजारो किलोमीटर दूर असलेल्या अफ्रिका खंडातील वंचित मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प घेण्यात आला. मानवी मूल्यांच्या संवर्धनावर मंगळवारी चिंतन-मनन होत असताना ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मंत्र कृतीत आणायचा असेल तर त्याची सुरुवात अफ्रिका खंडात अतिशय हलाखीच्या स्थितीत आयुष्य काढणाऱ्या मुलांच्या संवर्धनापासून सुरू करण्यात यावी, असा देशविदेशातील मान्यवरांचा सूर होता.
‘जी-२०’अंतर्गत येणाऱ्या नागपुरात आयोजित ‘सी-२० समिट’मध्ये मंगळवारी मानवी मुल्यांच्या संवर्धनावर सखोल मंथन करण्यात आले. या सत्रादरम्यान १०० मिलियन कॅम्पेनचे जागतिक संचालक ओवेन जेम्स यांनी हा मुद्दा मांडला. अफ्रिका खंडातील स्थितीत अगोदरच वाईट होती व कोरोनानंतर त्यात आणखी भर पडली आहे. विशेषतः अफ्रिका सहारा उपखंडातील लोकसंख्येत २०१५ पासून सातत्याने वाढ होत असून त्या तुलनेत तेथे सोयीसुविधा व विकास जैसे थे आहे. तेथील बहुतांश लोकसंख्या दिवसाला २.१५ अमेरिकी डॉलर्सपेक्षा कमी रकमेत गुजराण करत आहेत.
मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक स्त्रोत असूनदेखील तेथील लोक विकासापासून दूरच राहिले आहेत. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे उपखंडात बालकामगार व शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. या मुलांना न्याय देण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित यायला हवे. सी-२० च्या मंचावरून जगाने याबाबत संकल्प करावा असे आवाहन जेम्स यांनी केले.
‘युएन’ने धोरणांचा फेरविचार करावा
दुर्गानंद झा म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांच्या संकल्पनेचा व धोरणांचा पुनर्विचार करायला हवा. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणे व्यतिरिक्त, मानवी हक्कांची प्रादेशिक घोषणाही असावी. मानवी हक्कांचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध धोरणात्मक साधन म्हणून केला जाऊ नये असे ते म्हणाले.
- सत्रात सहभागी मान्यवर
सेवा इंटरनॅशनलचे जागतिक समन्वयक श्याम परांडे, साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष नसीमा हुरझुक, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्ष, डॉ. शशी बाला, अर्शा विद्या मंदिरचे स्वामी परमात्मानंदा, १०० मिलियन कॅम्पेनचे जागतिक संचालक ओवेन जेम्स, इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गुप्ता, युनायटेड कॉन्शियसनेस ग्लोबलचे संयोजक डॉ विक्रांत तोमर , गुवाहाटी येथील विवेकानंद सांस्कृतिक संस्था केंद्राचे अध्यक्ष, डॉ जोराम बेगी आणि सेंटर फॉर पॉलिसी ॲनालिसिसचे कार्यकारी अध्यक्ष दुर्गानंद झा.