जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

By admin | Published: April 13, 2016 03:07 AM2016-04-13T03:07:24+5:302016-04-13T03:07:24+5:30

काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात.

To make the world tremendously | जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

Next

पर्यावरण व विश्वशांतीचा देतात संदेश : तीन तरुण नागपुरात दाखल
नागपूर : काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात. त्यांचे ध्येय मात्र निस्वार्थी. त्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश द्यायचा आहे. जनजागृतीसाठी त्यांनी मार्ग स्वीकारला तो पायी चालण्याचा. या ध्येयासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर ११ देश आतापर्यंत पादाक्रांत केले. अवधबिहारी लाल, जितेंद्र प्रताप व महेंद्र प्रताप असे या तीन ध्येयवेड्या तरुणांची नावं. आपल्या पायी यात्रेदरम्यान मंगळवारी हे तिघेही नागपूरला पोहचले.
भारतच नाही तर संपूर्ण जगापुढे पर्यावरणाची समस्या आज मोठे आव्हान ठरत आहे. प्रदूषणामुळे आपल्या धरेचे पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र तरीही आपण जागायला तयार नाही. साधी भाजी घ्यायला जायचे असेल तरी आपल्याला वाहनाची आवश्यकता पडते. अशावेळी पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश द्यायचा असेल तर प्रदूषणमुक्त साधनाचा वापर करावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी थेट पायीवारी करण्याचा निश्चय केला. हा निश्चय त्यांनी प्रत्यक्षात कृतीतही आणला. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा प्रदेश त्यांनी पायीच पादाक्रांत केला. एवढेच काय तर बांगलादेश, भूतान, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बर्मा, थायलंड आणि चीन पर्यंत त्यांनी मजल मारली. पर्यावरण, विश्वशांती, कन्या भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश ते आपल्या यात्रेदरम्यान देत आहेत.
हे तिन्ही तरुण उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांच्या टीममध्ये २० सदस्य असल्याचे महेंद्र प्रताप याने सांगितले. ते वेगवेगळा प्रवास करतात. ४९ वर्षाचे अवधबिहारी हे त्यांच्या टीमचे लीडर आहेत. स्वत: महेंद्र प्रताप १२ वर्षाचा असताना एका कपड्यावर तो या मोहिमसाठी घराबाहेर पडला. आश्चर्य म्हणजे गेल्या २० वर्षापासून तो घरीही परतला नाही. त्याच्यासारखे इतरही आहेत. एक सदस्य तर या मोहिमेत शहीदही झाला. प्रवासात अनेक चित्तथरारक आणि जीवघेणे अनुभव त्यांना आले. मात्र त्यांचा प्रवास थांबला नाही. आता रस्त्यांची भीती त्यांना वाटत नाही. कारण अनेक प्रसंग त्यांनी भोगले आहेत. प्रवास करताना ते प्रत्येक गावात, शहरात जातात. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी भेटतात. त्यानंतर शाळा महाविद्यालयात पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करतात व पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. पोलिसांकडून त्यांना हवी ती मदत केली जाते. या मोहिमेची गिनीज बुक आॅॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनवेळा तर लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये पाचवेळा नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: To make the world tremendously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.