इतरांपेक्षा आपली रेषा मोठी करा

By admin | Published: April 3, 2015 01:54 AM2015-04-03T01:54:57+5:302015-04-03T01:54:57+5:30

जीवनातील यशस्वीतेचा संबंध हा मेरिटशी बिलकूल नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्याची रेषा

Make your line bigger than others | इतरांपेक्षा आपली रेषा मोठी करा

इतरांपेक्षा आपली रेषा मोठी करा

Next

नागपूर : जीवनातील यशस्वीतेचा संबंध हा मेरिटशी बिलकूल नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करा. मी जीवनात आपली रेषा मोठी करण्याचाच प्रयत्न केला, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे केले.
नागपूर शिक्षण मंडळाच्या महाल येथील दादासाहेब धनवटे ऊर्फ डी.डी.नगर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाला १४७ वर्षे पूर्ण झाली. या शाळेतून अनेक मान्यवर शिकून गेले. त्यात नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. आपल्या शाळेतील एक विद्यार्थी एकेक पायरी चढत आज देशाच्या केंद्रीय मंत्रिपदी विराजमान झाल्यानिमित्त नागपूर शिक्षण मंडळातर्फे गडकरी यांचा गुरुवारी सायंकाळी सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, नागपूर शिक्षण मंडळचे अध्यक्ष ए.के. गांधी, सचिव सुधीर बाहेती, कांचन गडकरी, शाळेचे मुख्याध्यापक अशोक डोफे व्यासपीठावर होते. याप्रसंगी गडकरी यांना शिकविणारे तत्कालीन शिक्षक, वर्गमित्र, वर्गमैत्रिणी आवर्जून उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, राजकारणाबाबत एक मतप्रवाह आहे. परंतु तो चुकीचा आहे. राजकारणात सर्वच वाईट नाही. मी जीवनात कधीच कुणाला काही मागितले नाही. माझा बायोडाटाही दिला नाही. मी भविष्याचा विचार करीत नाही, हेच माझ्या आनंदी असण्याचे कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय राजकारणात आल्यावर अनेकांनी मला अमुक कपडे घालण्याची गळ घातली परंतु मी कुणासाठीही बदलणार नाही. मला जे चांगले वाटते ते मी करतो. राजकारणात मी कधी खोटे बोलत नाही. सर्वांची कामे करतो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. याप्रसंगी त्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. जीवनात खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात परंतु माझ्या आईने व या शाळेने घातलेले संस्कार जीवनभर कामी आले. अनेक चांगले शिक्षक लाभले. त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. विद्यार्थी हा शिक्षकापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही आणि मला व्हायचेही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नितीन गडकरी यांचे शिक्षक किरण देशपांडे वर्गमित्र नियांत पाठक यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. वर्गमैत्रिण रेखा घुमराळकर यांनी गडकरींच्या यशस्वीतेसाठी गीत सादर केले.
ए.के. गांधी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश खानजोडे यांनी परिचय करून दिला. साधना पोहरे यांनी मानपत्राचे वाचन केले. अशोक डोफे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

गडकरीच भाजपच्या सत्तेचे शिल्पकार
नितीन गडकरी हे विदर्भातील एकमेव नेतृत्व आहे. विदर्भात आणि महाराष्ट्रात भाजपाच्या यशाचे खरे शिल्पकार कुणी असतील तर ते नितीन गडकरीच आहेत, असे गिरीश गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. गडकरी हे चतुर नसून भावूक आहे. त्यांच्या राजकारणात भावनेची आणि करुणेची धार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद ते दुसऱ्यांदा सहजपणे मिळवू शकले असते. परंतु त्यांनी ते नाकारले. सर्वधर्माच्या लोकांना जुळवून घेण्याचे काम ते करतात. विकासाच्या संदर्भात त्यांनी मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटतात. परंतु गडकरी जी राजकीय शिवीगाळ करतात, ते ऐकण्यास कुणी तयार राहत नसल्याचेही स्पष्ट केले.

Web Title: Make your line bigger than others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.