स्वत:मधील भीमसैनिक जागा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:21 AM2017-09-11T01:21:04+5:302017-09-11T01:21:22+5:30

देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते.

Make yourself a Gymnasium space | स्वत:मधील भीमसैनिक जागा करा

स्वत:मधील भीमसैनिक जागा करा

googlenewsNext
ठळक मुद्देधनराज डहाट : समता क्रांती परिषदेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते. मात्र या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत, कारण संघटित नाही. समतेचा लढा लढण्यासाठी आंबेडकरी समाजाला पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संघटना मजबूत करण्याचा संदेश दिला होता. त्यानुसार समता सैनिक दलाला बलशाली केले तर कुणी अन्याय करण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी स्वत:मधील भीमसैनिक जागा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक धनराज डहाट यांनी केले.
समता सैनिक दलाच्यावतीने रविवारी धम्मगुरु भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात समता क्रांती मार्च व समता क्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेला उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, बौद्ध रंगभूमीचे संजय जीवने, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाचा सहकारी प्रशांत दोन्ता, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे समन्वयक तुषार घाडगे, राजेंद्र साठे आदी उपस्थित होते. डहाट पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे ५० तुकडे झाले ही शोकांतिका आहे. मात्र बाबासाहेबांनी स्थापन केलेले समता सैनिक दल जिवंत आहे. अन्याय करणाºयापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यामुळे आता अन्याय सहन करणे बंद करा व समाजात अस्मितेचा लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. वैभव ओगले यांनी व प्रास्ताविक अ‍ॅड. स्मिता कांबळे यांनी केले.
मग अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारी कशाला करता : अ‍ॅड. मिर्झा
अ‍ॅड. फिरदौस मिर्झा यांनी रोखठोक विचार व्यक्त केले. अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे मानवतेविरुद्ध उचललेले पाऊल होय. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळात दलितांवर अन्याय झाल्याची एकही घटना नमूद नाही. समतेवर आधारीत जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देणाºया महामानव डॉ. आंबेडकरांच्या देशात अन्याय होणे ही शोकांतिका आहे. संविधानाचे रक्षण करण्यासह अल्पसंख्यांक म्हणून गणल्या जाणाºया मुस्लीमांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजाची आहे. मात्र ते यात कमी पडतात. अ‍ॅट्रॉसिटीचा लढा देण्यासाठी न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांमध्ये आमचे ‘बेस्ट’ वकील नाहीत. बाबासाहेबांनी संविधान दिले व समाजाने ते अन्याय करणाºयांच्या हातात सोपविले. आमचे लोक घटनातज्ज्ञ कधी होणार? अन्यायकर्ते आपले काम करतात, मात्र आम्ही आमचे काम करण्यात कमी पडतो. मग अन्याय होत असल्याची तक्रार कशाला करता, असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेबांनी हातात तलवार घेतली नाही, तर विद्वत्तेने विषमतेविरोधात लढा दिला. आंबेडकरी समाजालाही नव्या तंत्रज्ञानाची कास धरून संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
रोहित वेमुलाची जात शोधण्याचाच तपास
रोहित वेमुलाने आंबेडकरी स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमातून हैदराबाद विद्यापीठात अधिकारासाठी संघर्ष सुरू केला तेव्हा विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव व केंद्रीय यंत्रणेने संघटनेच्या पाच विद्यार्थ्यांविरोधात युद्ध पुकारले. याच व्यवस्थेतून रोहित वेमुलाचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याच्या मृत्यूची कारणे व विद्यापीठापीठातील जातीय गैरव्यवहार शोधण्यापेक्षा तपास यंत्रणेने त्याची जात शोधण्यातच वेळ घालविला. रोहितच्या मृत्यूनंतरही संघटनेतील विद्यार्थ्यांना यंत्रणेकडून लक्ष्य केले जात आहे व त्याच्या आईलाही त्रास दिला जात आहे. मात्र आम्ही आमचा लढा थांबविणार नाही, असे प्रतिपादन प्रशांत दोन्ता याने यावेळी केले.
 

Web Title: Make yourself a Gymnasium space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.