कामठीचा होतोय ‘मेकओव्हर’
By Admin | Published: May 23, 2017 01:59 AM2017-05-23T01:59:11+5:302017-05-23T01:59:11+5:30
शहर आणि परिसरातील गावांमधील विविध समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने २७०४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
२७०४ कोटींचे पॅकेज मंजूर : नागरिकांना मिळाला दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहर आणि परिसरातील गावांमधील विविध समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने २७०४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विविध विकास कामांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होण्याची कामठी शहराच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. शिवाय, या कामांचा शुभारंभही केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी कामठी येथे करण्यात आला. परिणामी, कामठी शहरासह परिसराचा ‘लूक’ बदलणार असल्याने तसेच मूलभूत समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कामठी शहरासह परिसरातील गावांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. परिणामी, २७०४.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला. हा निधी विविध कामांसाठी वापरला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने १५२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यात आॅटोमोटिव्ह चौक ते कन्हान या ६३.६ कि.मी.च्या नागपूर - कामठी अर्बन लिंक मार्गाचे काम केले जाणार आहे.याच निधीतून नागपूर - जबलपूर महामार्गाचे ४४ कि.मी. अंतराचे बहुपदरीकरण केले जाणार आहे. १८.८ कि.मी. लांबीच्या या कामासाठी एकूण २५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
फेटरी ते धारगाव सेक्शन
बोकारा - नारा - खसाळा - मसाळा - भिलगाव - खैरी - रनाळा - पवनगाव - धारगाव या मार्गावर चौपदरी आऊटर रिंग रोड तयार करण्यात येणार असून, हा मार्ग २८ कि.मी.चा राहणार आहे. या कार्यासाठी ६३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. वार्षिक योजनेअंतर्गत ‘आरओबी’चे व उड्डाण पुलाचे बांधकाम तसेच ड्रॅगन पॅलेसला कामठी शहराशी जोडण्यासाठी १.५ कि.मी. लांबीचा मार्ग व इतर कामांसाठी ३०० कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील कोराडी नाका येथे एक कि.मी. लांब उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ८० कोटी रुपये, वार्षिक योजनेअंतर्गत कोराडी औष्णिक ऊर्जा उर्जा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून कोराडीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील कि.मी. १०/२०० ते १२/२००, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ वर कोराडी देवी मंदिराला जोडण्यासाठी नांदगाव जंक्शनच्या बांधकामासाठी ३५ कोटी रुपये, वार्षिक योजनेअंतर्गत नागपूर बायपासवर १२.३० कि.मीच्या सेवा मार्गाच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. खैरी - पवनगाव - धारगाव - बोकारा - लोणारा सेक्शन व कामठी मतदारसंघातील इतर गावांसाठी २० कोटींची निधी मंजूर केला आहे.
भंडारा - घोटीटोक सेक्शन
खात - घोटमुंढरी - देवमुंढरी - भांडेवाडी - खंडाळा या राष्ट्रीय मार्ग क्रमांक - २४७ वरील काही भागाचे पेव्हड् शोल्डर्सच्या बांधकामासह दुपदरीकरणासाठी २३० कोटी मंजूर केले आहे. मौदा - रामटेक या नवीन राष्ट्रीय मार्गाच्या निर्मितीला तत्वत: मंजुरी देण्यात आली असून, यास कामासाठी ३५० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
भूमिगत विद्युत यंत्रणा
कामठी शहरातील विद्युत यंत्रणा भूमिगत करण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या कार्यासाठी ७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर कामठी शहरातील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा इतिहासजमा होणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गविषयक कामे
दहेगाव - वारेगाव - कामठी - अजनी - गुमथळा - भूगाव - कुही या राष्ट्रीय मार्ग क्रमांक- २४७ च्या सीएच ०.०० ते ११.६०६ कि.मी आणि सीएच १७.८७० ते सीएच ३२.००० तसेच सीएच ३५.६२० ते सीएच ५१.४२० या कामासाठी २८८.९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या निधीतून या मार्गाचे दुपदरीकरण व पेव्हड् शोल्डर्ससह बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे पुढे हा मार्ग ४१.५ कि.मी.चा राहणार आहे.
पाणीपुरवठा योजना
राज्य शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने २१.६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या निधीतून भिलगाव - खसाळा ही संयुक्त पाणीपुरवठा योजना तयार केली जाणार आहे. येरखेडा - रनाळा या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या निर्मितीसाठी १७.८६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या योजनेमुळे पाच लाख लिटर्स पाण्याची बचत होणार असून, वाचलेले अतिरिक्त पाणी कामठी शहराला पुरविण्यात येणार आहे. कामठी कॅन्टोनमेन्ट बायपास मार्गाच्या बांधकामासाठी ५.५३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामठी शहरात पाणी पुरवठ्यासाठी तीन झोन टाकी व वितरण व्यवस्था करण्यात येणार असून, यासाठी १०.११ कोटी रुपये मंजूर केले आहे. सदर कार्य कामठी नगर परिषदेच्या देखरेखीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाईल. एकूणच कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्याने कामठी शहरासह परिसराचा कायापालट होणार आहे.