परीक्षा पद्धतीत होणार मेकओव्हर
By admin | Published: April 14, 2015 02:18 AM2015-04-14T02:18:20+5:302015-04-14T02:18:20+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे.
कुलगुरूंचा ‘सुपरफास्ट पॅटर्न’: स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर होणार परीक्षा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी या परीक्षा पद्धतीमध्ये समूळ बदलाची आवश्यकता असून, ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याची आवश्यकता असल्याचे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रथमच प्रसिद्धी माध्यमांशी पत्रपरिषदेच्या माध्यमातून संवाद साधला.
आजच्या परीक्षा प्रणालीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर प्रचंड ताण वाढला आहे. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा पाठीचा कणा असतो, परंतु तो कोलमडायला आला आहे. अशास्थितीत विद्यापीठाला खरोखरच प्रगती करायची असेल तर नवीन परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याकरिता लागणारी तांत्रिक बाजू ‘आऊटसोर्स’देखील केल्या जाऊ शकते, असे डॉ. काणे यांनी सांगितले. ही परीक्षा प्रणाली वेगवान आणि आर्थिक खर्च वाचविणारी असेल. शिवाय या प्रणालीबाबत जनतेकडून मत मागविण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी-पालकांचे मत घेणार
जगातील अनेक विद्यापीठांत ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली अस्तित्वात असून ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीतील परीक्षा प्रणालीबाबत विद्यार्थी, पालक व जनतेची काय मतं आहेत व नवीन प्रणालीबाबत त्यांना काय वाटते, याबाबत विचारणा करण्यात येईल. यासाठी विद्यापीठाचे ‘पोर्टल’ तयार करण्यात येईल. तसेच प्राधिकरणांच्या सदस्यांना याचे महत्त्व पटविण्याचा प्रयत्न करू. जर आवश्यकता वाटली तर या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी विशेषाधिकाराचा उपयोग करायला मागे-पुढे पाहणार नाही, असे डॉ. काणे यांनी ठणकावून सांगितले.
महाविद्यालयांचे ‘एज्युकेशन आॅडिट’
महाविद्यालयांच्या परीक्षांत गैरप्रकार होण्याचे किंवा फार जास्त गुण देण्याचे प्रकार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी दरवर्षी ‘एज्युकेशन आॅडिट’ करण्यात येईल व गठ्ठ्यातील कुठल्याही उत्तरपत्रिकेची विद्यापीठाच्या समितीकडून पाहणी करण्यात येईल. त्यामुळे जर अवाजवी गुण देण्यात आले असतील तर ती बाब लक्षात येईल.