कुख्यात डेकाटे टोळीवर मकोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:04+5:302021-07-05T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अवैध सावकारी करून अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार राकेश डेकाटे आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अवैध सावकारी करून अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार राकेश डेकाटे आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांवर पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. दरम्यान, या टोळीतील दोन फरार गुन्हेगारांपैकी नरेश वासुदेवराव ठाकरे याच्याही पोलिसांनी मुसक्या बांधण्यात यश मिळविले आहे.
राकेश वासुदेवराव डेकाटे (वय ४२), मुकेश वासुदेवराव डेकाटे (वय ४०), महेश गणेश साबणे (वय ४५), मदन चंद्रकांत काळे (वय ६२) आणि नरेश ठाकरे अशी डेकाटे टोळीतील आरोपींची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या राकेश आधी चेनस्नॅचिंग करायचा. अशा प्रकारे दागिने हिसकावून त्याने माया जमविली आणि नंतर तो अवैध सावकारी करू लागला. कर्ज देताना स्थावर मालमत्ता लिहून घ्यायची, नंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिलेल्या रकमेवर अजब चक्रवाढ पद्धतीने व्याज लावायचे. कर्जदार रक्कम परत करण्यास असमर्थ असल्याचे हेरून ती मालमत्ता आपल्या नावाने करून घ्यायची, अशी डेकाटे आणि साथीदारांची पद्धत होती. अशाप्रकारे डेकाटेने अनेकांच्या मालमत्ता हडपल्या होत्या. धंतोलीतील एका वृद्ध दाम्पत्याचे निवासस्थान त्याने अशाच प्रकारे हडपण्याचा कट रचला. मात्र पीडित व्यक्ती थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे गेले आणि डेकाटे टोळीचे वासे फिरले. गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास जाताच पोलिसांनी धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल करून डेकाटे टोळीतील राकेश, महेश आणि मदन या तिघांना अटक केली. सध्या हे तिघेही कारागृहात असून, मुकेश डेकाटे आणि नरेश ठाकरे फरार झाले. त्यातील ठाकरेच्या पोलिसांनी शुक्रवारी मुसक्या बांधण्यात यश मिळविले. तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या पापाचा लेखाजोखा जमा करून पोलिसांनी त्यांच्यावर मकोका लावला.
---
पीडितांनो समोर या।
या टोळीकडून कुणाची फसवणूक झाली असेल तर अशांनी गुन्हे शाखा कार्यालयात येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केलेे आहे. पोलीस त्यांना न्याय मिळवून देतील, अशी ग्वाहीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
---