ईडीनंतर सतीश उके बंधूंसह सात जणांवर मकोका; जमीन हडपल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:43 AM2023-08-17T10:43:42+5:302023-08-17T10:44:44+5:30

एनआयटीची जमीन हडपली : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Makoka on seven including Satish Uke brothers after ED | ईडीनंतर सतीश उके बंधूंसह सात जणांवर मकोका; जमीन हडपल्याचा आरोप

ईडीनंतर सतीश उके बंधूंसह सात जणांवर मकोका; जमीन हडपल्याचा आरोप

googlenewsNext

नागपूर :नागपूर सुधार प्रन्सासच्या (एनआयटी) जमिनीवर ले-आऊट टाकून विक्री करीत कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या उके बंधू आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिसांनी ॲड.सतीश महादेवराव उके, त्यांचा भाऊ प्रदीप महादेवराव उके, त्यांची पत्नी माधवी उके, शेखर महादेवराव उके, मनोज महादेवराव उके, सुभाष बघेल आणि चंद्रशेखर मते यांना आरोपी केले आहे. तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अजनीच्या बाबूळखेडा येथे एनआयटीची जमीन होती. हे प्रकरण ०.४१ हेक्टर जमिनीचे आहे. सूत्रांनुसार श्रीरंग सोसायटीचे सुभाष बघेल आणि महापुष्प क्रिएशनचे सतीश उके यांनी ही फसवणूक केली. त्यांनी बनावट कागदपत्रे आणि पॉवर ऑफ ॲटर्नी करून जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगितले.

उके बंधूंनी कुटुंबीय आणि साथीदारांच्या मदतीने या जमिनीवर ले-आऊट टाकले. तेथे ३६ प्लॉट पाडून नागरिकांना विकले. फसवणूक उघड होताच नागरिकांनी एनआयटीत तक्रार दिली. परंतु, त्यावेळी एनआयटीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही.

ईडीने एप्रिल २०२२ मध्ये उके बंधूंना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केली होती. यानंतर उपरोक्त प्रकरणात पोलिसांनी एनआयटीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ५ जानेवारीला उके बंधू आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध अजनी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला उके बंधूंविरुद्ध ठोस पुरावे मिळाले आहेत. उके बंधूंविरुद्ध आधीही फसवणूक आणि जमिनीचा ताबा मिळविल्याचे गुन्हे दाखल होते. त्या आधारावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. उके बंधू सध्या मुंबईच्या कारागृहात आहेत. इतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

Web Title: Makoka on seven including Satish Uke brothers after ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.