बचत गटांसाठी मॉल उघडणार
By admin | Published: March 14, 2016 03:07 AM2016-03-14T03:07:38+5:302016-03-14T03:07:38+5:30
राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी,
देवेंद्र फडणवीस : महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप
नागपूर : राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्याची ठिकाणे व नगरपालिका असलेल्या शहरात मॉल उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.
महापालिकेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रश्मी फडणवीस, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माधवी नाईक, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त नयना गुंडे, बसपाचे गटनेते गौतम पाटील, समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर आदी उपस्थित होते.
मानव संसाधनाच्या दोन चाकांचे बळ मिळाले तरच गतिशील विकास शक्य आहे. राज्यात महिला बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचा शासनाचा मानस आहे. मोठे उद्योगपती राष्ट्राचे पैसे बुडवतात. परंतु महिला बचत गट महामंडळ वा बँकांकडून घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे परत करतात. महिला यशस्वीपणे उद्योग चालवू शकतात. चांगले काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. महापालिका गेल्या सात वर्षांपासून उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या माध्यमातून बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या मेळाव्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्या हस्ते यशस्वी बचत गटांच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात हस्तशिल्प बचत गटाच्या पुष्पा ठाकरे, जयदुर्गा बचत गटाच्या संगीता देसाई, चित्रशाळा माता बहुउद्देशीय संस्थेच्या वर्षा मेहर, शीलवंत बचत गटाच्या अश्विनी पाटील, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. रिना खुरपडी तसेच प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील मुख्य समारंभात सहभागी झालेल्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. रश्मी फडणवीस यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची माहिती दिली तर आभार साधना बरडे यांनी मानले. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी तसेच बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)