मालविका बन्सोडला दुहेरी मुकुट
By admin | Published: July 9, 2017 01:46 AM2017-07-09T01:46:11+5:302017-07-09T01:46:11+5:30
प्रतिभावान खेळाडू मालविका बन्सोड हिने कराड येथे शनिवारी संपलेल्या म. राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.
राज्य ज्युनियर बॅडमिंटन : गुरबानी, केऱ्हळकर, लांबे विजेते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिभावान खेळाडू मालविका बन्सोड हिने कराड येथे शनिवारी संपलेल्या म. राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.येथे आलेल्या वृत्तानुसार मालविकाने १७ आणि १९ वर्षे एकेरीचे जेतेपद पटकविले. नागपूरचे अन्य खेळाडू रोहण गुरबानी, सौरभ केऱ्हळकर आणि राशी लांबे यांनी देखील आपापल्या गटात जेतेपदाचा मान मिळविला आहे.
मालविकाने १७ वर्षे मुलींच्या अंतिम सामन्यात पुण्याची तनिष्का देशपांडे हिचा २१-१८, २१-१४ ने पराभव केला. १९ वर्षे गटाच्या अंतिम सामन्यात तिने बृहन्मुंबईची रिया आकोलकर हिच्यावर २१-७, २१-९ ने सहज विजयाची नोंद करीत दुसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
१७ वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात रोहणने पुण्याचा यश शाह याचा २१-१६, २१-१६ ने पराभव केला. सौरभ केऱ्हळकरने मुंबईचा दीप रांभिया याच्या सोबतीने दुहेरीच्या अंतिम सामन्यात नागपूरचा गौरव मिठे आणि पुण्याचा अनिरुद्ध मयेकर या जोडीवर २१-१५,२१-१८ ने विजय नोंदविला. मिश्र दुहेरीत राशी लांबे- अक्षय शेट्टी यांनी रिया आकोलकर- दीप रांभिया या जोडीवर २१-१९, २१-१५ ने मात केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.