मतदानाच्या पूर्वसंध्येला ममता आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:35+5:302021-04-01T04:07:35+5:30
माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, विरोधकांना इशारा - भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क गोघाट/कोलकाता - पश्चिम बंगालमधील ...
माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, विरोधकांना इशारा - भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोघाट/कोलकाता - पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे वातावरण तापले असून दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. नंदीग्राममध्ये माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांचे फोटो व व्हिडीओ माझ्याकडे आहेत. निवडणूक झाल्यानंतर त्या लोकांना सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच ममता यांनी दिला आहे. प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
माझ्या कारवर हल्ला करण्याची त्यांची हिंमतच कशी झाली. सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे मी शांत आहे. निवडणूक नसती तर त्यांनी किती मोठी चूक केली आहे, हे त्यांना सांगितले असते. निवडणूक झाल्यावर त्यांना सोडणार नाही, असे ममता म्हणाल्या. शुभेंदु अधिकारी यांचे नाव न घेता कोणता गद्दार तुम्हाला वाचवतो, हे मी पाहते. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश कुठेही गेला तरी मी तुम्हाला खेचून आणील, या शब्दात ममता यांनी हल्लेखोरांना इशारा दिला. मंगळवारी हिंसाचारात जखमी झालेल्या तृणमूल कार्यकर्त्याला भेटायला जात असताना मुख्यमंत्र्यांशी विरोधी पक्षांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली होती.
भाजपकडून ममतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
दुसरीकडे भाजपने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. ममता प्रचार सभांदरम्यान भाजपच्या समर्थकांना धमकी देत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूलच्या अध्यक्षांच्या निर्देशावरून मागील काही दिवसांपासून हिंसाचार वाढला आहे. केंद्राचे सुरक्षा बल निवडणूक झाली की परत जाईल, मात्र मी बंगालमध्येच असेल. तेव्हा विरोधकांना कोण वाचवेल, या शब्दात ममतांनी धमकीच दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.