पराभवाच्या भीतीमुळेच ममतांकडून समर्थनाची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:41+5:302021-04-02T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जयनगर (पश्चिम बंगाल) - पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता वाढली आहे. ज्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जयनगर (पश्चिम बंगाल) - पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता वाढली आहे. ज्यांना त्या आजपर्यंत बाहेरील व्यक्ती म्हणत होत्या व भेटण्याचीदेखील वेळ देत नव्हत्या, त्यांना पत्र लिहून समर्थन मागण्यात येत आहे. पराभवाच्या भीतीनेच ममतांकडून समर्थनाचे पत्र लिहिण्यात आले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ममता यांनी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून भाजपविरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.
प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान बोलत होते.
ममता बॅनर्जी यांनी अगोदर जय श्रीरामचा नारा व दुर्गा विसर्जनावर हरकत घेतली होती. मात्र आता त्यांना भगवे वस्त्र धारण करण्यावरदेखील आक्षेप आहे. पराभवाच्या अस्वस्थतेतून त्या अशा करत आहेत. त्यांनी बंगालसोबत विश्वासघात केला आहे आणि आता बंगालची परंपरा-मर्यादांचादेखील अपमान करत आहेत. मतांसाठी कुणाला खूश करायचे असेल तो त्यांचा अधिकार आहे. मात्र लोकांची आस्था, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या महत्तेवर प्रश्नचिन्ह मी उपस्थित होऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.
ममतांनी संविधानाचा अपमान केला
पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी यांनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप लावला. बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांविरोधात शत्रूत्वाच्या भाषेचा उपयोग केला. भारताचा संविधान एका मुख्यमंत्र्याला दुसऱ्या राज्यातील लोकांचा अपमान करण्याची परवानगी देत नाही. ममतांनी माझा अनादर करावा मात्र संविधानाचा अपमान करू नये, असे मोदी म्हणाले.