भाजपविरोधातील आघाडीसाठी ममतांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:57+5:302021-04-01T04:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या ...

Mamata's initiative for anti-BJP front | भाजपविरोधातील आघाडीसाठी ममतांचा पुढाकार

भाजपविरोधातील आघाडीसाठी ममतांचा पुढाकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील पक्षांच्या १५ महत्त्वाच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. भाजपकडून लोकशाहीवर प्रहार होत असल्याचा आरोप करत सर्वांनी त्याविरोधात एकजूट दाखविली पाहिजे, असे आवाहन केले आहे. ममतांकडून देशपातळीवर भाजपविरोधात आघाडीसाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात भाजप व केंद्र शासनाकडून लोकशाही व घटनात्मक संघराज्य प्रणालीवर हल्ला, यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. भाजपाकडून ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे, तो चिंतेत टाकणारा आहे. लोकशाहीवर जो हल्ला होत आहे, त्यामुळेच मी सर्वांना पत्र लिहित आहे. राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र (संशोधन) विधेयक-२०२१ चा त्यांनी यात दाखलादेखील दिला आहे. भाजपचे शासन नसलेल्या राज्यांमध्ये सीबीआय, ईडी यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा उपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यांना आवश्यक तो निधी पुरविला जात नाही. देशात एकाच पक्षाचा प्रभाव असावा, यादृष्टीने भाजपकडून पावले टाकण्यात येत आहेत. कधी नव्हे ते सत्ताधारी व विरोधकांमधील संबंध अतिशय खराब झाले आहेत. सर्वांनी भाजपविरोधात एकत्रित येत लोकशाहीला वाचविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आपल्या एकतेतूनच आपण विजय मिळवू शकतो, असे आवाहन ममता यांनी या पत्रातून केले आहे.

Web Title: Mamata's initiative for anti-BJP front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.