भाच्याला आशीर्वाद देताना मामीची पर्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:56+5:302021-01-15T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेलेल्या वराच्या मामीची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये रोख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेलेल्या वराच्या मामीची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये रोख आणि सोन्याचे दागिने होते. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नसमारंभस्थळी १० जानेवारीच्या पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पांढुर्णा (जि. छिंदवाडा) येथील अविनाश चंद्रभान डफरे (वय ५४) यांच्या भाच्याचे लग्न १० जानेवारी रात्री दिघोरीतील ओमकार सेलिब्रेशन लॉनमध्ये होते. डफरे दाम्पत्य पहाटे २ च्या सुमारास नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेले. डफरे यांच्या पत्नीने त्यांच्या जवळची पर्स स्टेजच्या बाजूला खुर्चीवर ठेवली. एका चोरट्या महिलेने ही पर्स लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डफरे दाम्पत्याने नातेवाइकांना सांगितला. पाहुणे मंडळीकडे विचारपूस करण्यात आली; मात्र कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे डफरे यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरीला गेलेल्या पर्समध्ये रोख ४ हजार आणि सोन्याचे दागिने होते. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्या महिलेचा शोध घेतला जात आहे.