नागपुरातील युवक कानपुरातील युवतीचे ऑनलाईन प्रेम, ‘चल कहीं दूर... निकल जाये’चा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 02:18 PM2021-10-07T14:18:53+5:302021-10-07T14:23:48+5:30
अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील १७ वर्षीय युवक आणि कानपूर (उत्तरप्रदेश) मधील अल्पवयीन मुलगी यांचे ऑनलाईन प्रेम फुलले आणि रविवारी दुपारी ते घरून पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी धावपळ केली अन् त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने इंदोरमध्ये पकडले.
फिल्मी वाटावी अशी ही लव्हस्टोरी आहे, कोणाची कुठे ओळख होईल आणि कधी प्रेम फुलेल काही सांगता येत नाही. झालं अस की, अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले.
ऑनलाईनच्या आभासी जगतात वावरणाऱ्या या दोघांनी घर सोडून ‘चल कहीं दूर... निकल जाये...’ चे मेसेज एकमेकांना टाकले अन् रविवारी दुपारी घरून पळून गेले. बऱ्याच वेळेपासून युवक दिसत नसल्याने आईने रविवारी दुपारपासून मुलाची शोधाशोध केली. नंतर बेलतरोडी ठाण्यात धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला. युवक मध्यप्रदेशमधील इंदोरकडे जात असल्याचे लक्षात येताच तेथील पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगीही आढळली. प्राथमिक चाैकशीत त्यांच्या ऑनलाईन लव्हस्टोरीचा खुलासा झाला.
पोलीस पथक रवाना
या दोघांच्याही पालकांना तसेच पोलिसांना ते इंदोरमध्ये असल्याचे कळल्याने नागपूर (बेलतरोडी) तसेच कानपूर येथील पोलीस पथक इंदोरकडे निघाले. मुलीला कानपूर तसेच मुलाला नागपूर पोलीस ताब्यात घेऊन आपापल्या शहरात परतणार आहेत. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कडक कारवाईची शक्यता नाही.