‘बस्ती मे दुकान चलाना है की नही’ म्हणून मागितली खंडणी
By दयानंद पाईकराव | Published: March 30, 2023 02:03 PM2023-03-30T14:03:35+5:302023-03-30T14:04:25+5:30
आरोपीस अटक : ५० हजाराची सोन्याची चेन हिसकावली
नागपूर : ‘बस्ती मे दुकान चलाना है की नही’ असे म्हणून महिन्याला सहा हजार रुपये खंडणी मागून किराणा दुकानदाराला जखमी करणाऱ्या आरोपीस हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
अंशुल अनिल तिवारी (३०, न्यु अमरनगर, मानेवाडा रोड) यांचे सिद्धेश्वरीनगर चंद्रकिरण सोसायटी हुडकेश्वर येथे समैरा ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. बुधवारी २९ मार्चला सकाळी ११ वाजता ते दुकानात हजर असताना आरोपी ईश्वर शंकर बघेल (२०, विठ्ठलनगर, अवधुतनगर) हा दुकानात आला. ‘तेरे को बस्ती मे दुकान चलाना है की नही’ असे म्हणून दर महिन्याला सहा हजार रुपये दिले नाही तर ‘तेरे को काट डालुंगा’ असे म्हणून आरोपीने खंडणीची मागणी केली.
आरोपीने दुकानाच्या बाहेर रस्त्यावर जाऊन हातात दगड उचलून शिविगाळ केली व तिवारी यांची गाडी फोडण्याची धमकी दिली. आरोपीला थांबविण्यासाठी तिवारी त्याच्या मागे गेले असता आरोपीने हातातील दगड त्यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. तसेच तिवारी यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतिची १० ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेली. तिवारी यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी ईश्वर विरुद्ध कलम ३९४, ३८४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.